मिलिंद संगई, बारामती
महाराष्ट्रातील बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राने (KVK) शेती क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. पारंपरिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा जो यशस्वी प्रयोग बारामतीत झाला, त्याची दखल आता केवळ केंद्र सरकारनेच नव्हे तर जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्यांनीही घेतली आहे. आज केव्हीके बारामतीचा एआय ऊसशेती प्रकल्प हे दाखवतो की परंपरेला विज्ञानाची जोड दिल्यास शेती समृद्ध, आधुनिक आणि टिकाऊ होऊ शकते. हा प्रकल्प केवळ तांत्रिक प्रयोग न राहता, भारताच्या कृषी भविष्याची दिशा ठरविण्यास आदर्श मॉडेल ठरत आहे.
केंद्र सरकारच्या ‘डिजिटल अॅग्रीकल्चर मिशन २०२५’ अंतर्गत बारामतीचे हे यश आता देशभरातील इतर राज्यांमध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात ऊस शेतीपासून झाली असली तरी, आता याचा विस्तार विविध फळबागा आणि अन्नधान्य पिकापर्यंत करण्यात आला आहे. उसाव्यतिरिक्त अनेक प्रमुख पिकांमध्ये उल्लेखनीय यश मिळत आहे. डाळिंब पिकामध्ये हवामान व रोगपूर्वसूचना प्रणालीमुळे तेल्या व बॅक्टेरियल ब्लाइटसारख्या रोगांचे वेळेवर नियंत्रण शक्य झाले असून, उत्पादनात सरासरी २५ ते ३० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. दर्जेदार फळांचे प्रमाण वाढले आहे. केळी पिकामध्ये माती, आर्द्रता, सेन्सर व अचूक सिंचन व्यवस्थापनामुळे सिगाटोका रोगाचे प्रमाण कमी झाले असून, पाण्याच्या वापरात ३० ते ४०टक्के बचत आणि उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. कांदा पिकासाठी परिणामी विक्रीयोग्य उत्पादनात २० ते ३० टक्के सुधारणा दिसून आली आहे. मका पिकामध्ये एआय आधारित हवामान अंदाज व खत व्यवस्थापनामुळे लष्करी अळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळाले असून, प्रति हेक्टर उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. तूर पिकामध्ये ड्रोन व इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कीडग्रस्त भाग अचूक ओळखून मर्यादित फवारणी केल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला असून, प्रति हेक्टर १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता वाढली आहे. या सर्व पिकांमध्ये एआय आधारित शेतीमुळे केवळ उत्पादन वाढले नाही, तर पाणी, खत व कीटकनाशकांचा वापर कमी होऊन शेती अधिक शाश्वत, नफाक्षम आणि पर्यावरणपूरक बनत आहे. केव्हीके बारामतीचे हे मॉडेल बहुपीक व्यवस्थापनासाठी यशस्वी ठरले आहे.
या प्रकल्पात वापरले जाणारे १०१ सेन्सर ही दुसरी मोठी क्रांती आहे.
एआय आधारित ऊसशेती प्रकल्पात १०१ सेन्सरचा वापर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. शेतीतील पारंपरिक अंदाजावर आधारित पद्धतीऐवजी, आता जमिनीतील बदल, हवामान स्थिती, पोषणद्रव्ये, व आर्द्रता यावरील मोजमापे आयओटी सेन्सर्सद्वारे अचूक आणि रिअल-टाइम केली जातात. जमिनीत बसवले जाणारे गूदा आर्द्रता सेन्सर (WET150, VH400) जमिनीतील ओलावा मोजतात आणि पाण्याची गरज असताना शेतकऱ्याला मोबाईल अॅप किंवा एसएमएसद्वारे सूचना दिली जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो आणि सिंचन अधिक कार्यक्षम बनते. तसेच मातीतील क्षारता व पोषण स्थिती जाणण्यासाठी मृदा EC सेन्सर (Decagon STE) वापरले जातात त्याच्या मदतीने खतांचे अचूक नियोजन केले जाते. हवामानाशी संबंधित तापमान व आर्द्रता सेन्सर (जसे DHT22, SHT31) वातावरणातील बदल टिपतात आणि त्यामुळे रोगप्रसाराचे शक्य धोके आधीच ओळखता येतात. पानांवरील ओलसरतेमुळे बुरशीजन्य रोगांची शक्यता वाढते हे लक्षात घेऊन पर्ण आर्तता सेन्सर (SMT-LWS) वापरले जातात. तसेच NDVI व इमेज सेन्सर्सच्या साहाय्याने पीक कितपत तणावात आहे, त्यात आरोग्यदृष्ट्या दर्जा काय आहे हे समजते. या सर्व सेन्सरमधून येणारा डेटा IoT गेटवे (ESP32, Raspberry Pi) द्वारे A1 प्रणालीला पाठवला जातो. एआय अल्गोरिदम त्याचे विश्लेषण करून कृषिक अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत सूचना पाठवतो- जसे की सिंचनाची वेळ, खताची मात्रा, कीटक नियंत्रणाची वेळ, काढणीची तयारी इत्यादी. या सेन्सर आधारित प्रणालीमुळे पाणी वापरात ३० ते ४० टक्के बचत, खताचा वापर २० ते २५ टक्के पट, कीडरोगांचे अचूक नियंत्रण आणि उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
या तांत्रिक प्रणालीच्या पूरक म्हणून केव्हीके बारामतीने उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. इस्रोकडून मिळणाऱ्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग करून, शेतजमिनीचे अचूक नकाशांकन (GIS Mapping) करण्यात येते. यामुळे शेताची सीगा, पिकाची स्थिती,
जमिनीतील आर्द्रता आणि वनस्पर्तीची घनता याबाबत सविस्तर माहिती मिळते. शेतीतील हरिततेवे विश्लेषण NDVI (Normalized Difference Vegetation Index) या संकेतकाच्या माध्यमातून केले जाते. यामुळे पीक आरोग्य, पोषण स्थिती, पाण्याची कमतरता किंवा कीड रोगाचा संभाव्य धोका अगोदरच ओळखता येतो याशिवाय उपग्रह आधारित हवामान अंदाजाचा वापर करून पेरणी, सिंचन, खत व्यवस्थापन आणि काढणीची वेळ यांचे अचूक नियोजन करता येते. हवामानातील बदलांची सामना करत ऊसशेती प्रकल्पात पूर्वानुमानात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता (Predictive AI) प्रणालीचा वापर करून शेतक-यांसाठी हवामान सुसंगत शेती (Climate-Resilient Farming) साकारली आहे.
उत्पन्नाचे नुकसान टळते
या एआय प्रणालीमध्ये हवामान, मातीची स्थिती, आणि पिकांचे जुने उत्पादन डेटा यांचा अभ्यास केला जातो. प्राप्त झालेल्या ट्रेंड्स आणि पॅटर्न्सवर आधारित, शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक भविष्यवाणी दिली जाते. यामधील एक महत्त्वाची बाब म्हणजे पर्जन्यमानाचे अंदाज. या अंदाजाच्या आधारे शेतकरी सिंचन, बीपेरणी आणि स्वतः व्यवस्थापनाचे नियोजन अचूक करू शकतात. याशिवाय, एआय प्रणाली वातावरणातील बदल आणि हंगामी पॅटर्न ओळखून कीटकांचा संभाव्य प्रादुर्भाव आधीच ओळखते आणि शेतकऱ्यांना योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना (जसे की जैविक कीटकनाशकांचा वापर किंवा पीक बदल) यांचे मार्गदर्शन करते. तसेच, ही प्रणाली उत्पादनाचे पूर्वानुमान सुद्धा देते. जमिनीचे आरोग्य, हवामानाचा कल, आणि पीक प्रकार यावर आधारित, अंदाजित उत्पादन काढले जाते. जे बाजार नियोजन, साखर कारखान्यांसोबत समन्वय, व यंत्रसामग्री व्यवस्थापन यासाठी उपयोगी ठरते. या एआय प्रणालीच्या वापरामुळे शेतकरी फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देत नाहीत, तर आधीच तयारी करत प्रोटेक्विव्ह भूमिका घेतात. त्यामुळे हवामानाशी संबंधित धोके कमी होतात, उत्पन्नाचे नुकसान टळते, आणि आर्थिक स्थैर्य वाढते. यामुळे पाणी, बियाणे, व खताचा अचूक व कमी वापर होतो, जो दीर्घकालीन शाश्वत शेतीला चालना देतो.
या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य
एआय, आयओटी, जीआयएस आणि उपग्रह तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर करून शेतकरी निर्णयक्षम बनवला जातो. प्रकल्पाची सुरुवात माती परीक्षणापासून होते. शेतकऱ्यांकडून घेतलेले मातीचे नमुने केव्हीकेच्या प्रयोगशाळेत तपासले जातात. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कर्ब यांचे मोजमाप केले जाते. यानंतर, प्रत्येक शेतासाठी त्याच्या विशिष्ट गरजांनुसार खतांचा प्रकार, प्रमाण आणि वेळ एआय आधारित शिफारस केली जाते. त्यामुळे अचूक पोषण मिळाल्याने पिकांची वाढ झपाट्याने होते आणि खर्चात मोठी बचत होते. या शिफारशी मोबाईल अॅप, एसएमएस किंवा कॉलद्वारे
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात.
ऊस उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ
एआय प्रणालीद्वारे ऊस उत्पादनात ३०-४० टक्के इतकी वाढ झाली असून उसामधील सुक्रोजवे प्रमाणही वाढले आहे. परिणामी, साखर रिकव्हरी दरात सुधारणा होऊन साखर कारखान्यांना अधिक दर्जेदार ऊस मिळू लागला आहे. यामुळे कारखान्यांचे शुगर उत्पादन वाढले असून इथेनॉल निर्मितीसाठी आवश्यक असलेला उच्च गुणवत्तेचा ऊसही सहज उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमाला हे एक मजबूत पाठबळ ठरत आहे. एआय प्रणालीद्वारे ऊस पिकाच्या वाढीची स्थिती, कापणीचा योग्य काळ, हवामानाचे प्रभाव, आणि पीक जोमदार की नाही याचे अंदाज अगदी अचूक मिळतात. यामुळे साखर कारखान्यांना उसाचा स्थिर व वेळेवर पुरवठा मिळतो, ज्यामुळे दैनंदिन गाळपाचे नियोजन अचूकपणे करता येते.
उत्पादन खर्चात मोठी बचत
एआय प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खताचा योग्य डोस, पाण्याची गरज, रोग-कीटक यांचा अंदाज व उपाय वेळेत मिळतो. परिणामी उत्पादन खर्चात मोठी बचत होते. हेच फायदे अप्रत्यक्षरीत्या साखर कारखान्यावरही परिणाम करतात, कारण कारखान्यांना जास्त ऊस कमी खर्चात उपलब्ध होतो. साखर उद्योगासाठी आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे शाश्वत शेतीची दिशा जलसिंचन व कीटकनाशकांचा मर्यादित वापर आणि पर्यावरणपूरक पद्धती यामुळे उद्योग अधिक हरित व पर्यावरणस्नेही बनत आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी केवळ शेती सुधारण्यासाठी नव्हे, तर ऊस उद्योगातील संपूर्ण पुरवठा साखळी (supply chain) मजबूत आणि पारदर्शक बनवण्यासाठी प्रभावी ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.