बारामती, ता. २८: दादा कुठे आहात तुम्ही...दादा परत या....दादा तुम्हाला विसरूच शकत नाही....तुमचा तो सलाम आमच्या आयुष्याला सदैव दिशा देत राहील. अशा आशयाचे संदेश....प्रसन्न मुद्रेतील छायाचित्र, त्यांचे संवाद आणि त्यांनी बारामतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत पुन्हा एकदा अवघी बारामती अजित पवारांसाठी शनिवारी (ता. २८) भावुक झाली.
बारामती विमानतळावर अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी २०२६ला अपघात झाल्यानंतर त्या दिवसाचे जे चित्र होते, तसेच चित्र महिन्यानंतरही बारामतीत कायमच आहे. बारामतीकर सुन्न आहेत, दैनंदिन कामे सुरू आहेत पण त्यात कसलाच उत्साह नाही किंवा कोठेही प्रसन्न वातावरण नाही. चौकाचौकात आणि प्रत्येक गल्लीमध्ये जेथे जेथे लोक एकत्र येतात तेथे हमखास अजित पवार यांचा विषय निघतो आणि लोकांचे डोळे पाणावले होते. दादा परत या....या पोस्ट ठिकठिकाणी दिसून आल्या. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपचे स्टेटस, रिल्स आणि विविध माध्यमातून शनिवारी बारामतीकरांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा आपल्यात नाहीत, ही भावनाच लोकांना सहन होत नाही असेच चित्र समाजाच्या विविध स्तरातून सातत्याने पाहायला मिळत आहे. या धक्क्यातून सावरण्याची आजही लोकांची मनःस्थिती नसल्याचे जागोजागी लोकांच्या भावना ऐकल्यानंतर स्पष्ट होते. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी पवार यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी असंख्य बारामतीकरांनी जात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. या ठिकाणी आल्यावर त्यांच्या आठवणींमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. बारामतीकरांनी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वच्छता मोहीम, भजन, भक्तिगीत, सर्वधर्मीय प्रार्थना या सारखे कार्यक्रम आयोजित केले होते. बारामती स्वच्छ असावी या उद्देशाने अजित पवार यांनी कायम प्रयत्न केले, त्या अनुषंगाने बारामतीतही अनेक संस्था व संघटनांच्या वतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला जात असल्याचे चित्र होते.
भावस्पर्शी गीतांमुळे अनेक जण व्याकूळ
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विविध संदेश देताना अजित पवार यांच्या आयुष्यातील काही क्षण समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करताना त्याला ज्या गीतांची जोड देण्यात आली होती, ते ऐकून अनेक जण पुन्हा एकदा व्याकूळ झाल्याचे पाहायला मिळाले. बारामतीतील प्रत्येक रस्त्यावर, पदपथावर व चौकातून वावरताना त्या ठिकाणी अजित पवार यांनी दिलेल्या भेटी व विकासासाठी उचललेली पावले यांचे स्मरण बारामतीकरांना होत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.