बारामती, ता. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर यंदा तिथीनुसार साजरी करण्यात येणारी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. यात नमूद केले आहे की, अजितदादांच्या विमान अपघातातील निधनामुळे बारामतीसह राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने विकासाची नवी उंची गाठली होती. अशा लोकप्रिय नेतृत्वाला गमावल्याची वेदना बारामतीकरांच्या मनात कायम आहे.
या पार्श्वभूमीवर बारामतीतील शिवप्रेमी नागरिकांनी यंदाची श्री छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसारची जयंती साध्या आणि संयमी पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा होणारा हा स्वाभिमान, शौर्य आणि संस्कारांचा सोहळा यंदा दुःखाच्या छायेत पार पडणार आहे.
सर्व शिवजयंती मंडळे, सामाजिक संस्था व शिवप्रेमी बांधवांना आवाहन आहे की, यंदा फटाक्यांची आतषबाजी, डीजे, मोठ्या आवाजातील वाद्यवृंद, फ्लेक्स, जल्लोषाचे कार्यक्रम टाळावेत. सामाजिक सलोखा आणि संवेदनशीलता जपत उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात यावा.
तिथीनुसार शिवजयंती शुक्रवारी (ता. 6) साजरी करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता कसब्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन होईल. संध्याकाळी साडेपाच वाजता पारंपरिक पद्धतीने साध्या पालखीतून टाळमृदंगाच्या गजरात, वारकरी बांधवांच्या सहभागातून मिरवणूक काढण्यात येईल.
यंदा उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. दुःखाच्या या क्षणी एकजूट आणि संयम दाखवत शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.