चाकण ,ता. २० : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीतील मतमोजणी रविवारी (ता. २१) होत आहे. या निमित्ताने सकाळी सहा वाजल्यापासून मीरा मंगल कार्यालयातील मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २० पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, १४० पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवारांना मिरवणुका काढता येणार नाही, तसेच जमाव करता येणार नाही. डीजे वाद्यावर मिरवणुका काढता येणार नाही. आचारसंहितेचे नियम उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी पाळणे गरजेचे आहे. सकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणी केंद्रावर पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. काही उमेदवारांच्या घराभोवती ही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे उत्तर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल मोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अंकुश जाधव यांनी सांगितले की, सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्रात उमेदवार व त्यांच्या एका प्रतिनिधीला सकाळी साडेनऊ वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. एकूण बारा प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील. त्यानंतर काही प्रभागात दोन व तीन फेऱ्या होतील. एक ते दीड तासात चित्र स्पष्ट होईल. साधारणपणे दुपारी बारा वाजेपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल