खोडद, ता.२७ : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सकारात्मक घोषणा केल्याने आता संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पावर अनेक तालुके, शेतकरी, बेरोजगार तरुण यांचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहेत.या मार्गे जाणारी रेल्वे संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील प्रत्येकासाठी प्रगतीचा मार्ग ठरणारा प्रकल्प आहे. मागील ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्या सर्वेक्षणानुसारच व्हावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातून आता अधिक जोर धरू लागली आहे. अहिल्यानग-शिर्डी मार्गे जाणारा हा रेल्वे मार्ग हा अधिक अंतरावरून जाणारा मार्ग असून यामुळे वाढणारा अनावश्यक खर्च हा जीएमआरटीच्या (रेडिओ दुर्बीण प्रकल्पाच्या परिसरामध्ये अंडरग्राऊंड करण्यासाठी वापरता येऊ शकतो. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा अधिक पर्यावरणपूरक, वेळेची बचत करणारा, इंधन बचत करणारा आणि कमी जागा लागणारा प्रकल्प आहे. अनेक तरुण पुण्यात शिक्षण घेत आहेत तर काही तरुण पुणे-नाशिक सारख्या ठिकाणी नोकरी करत आहेत. रोज पुण्यातून किंवा नाशकातून घरी येणे शक्य नसल्याने विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरुणांना पुण्यातच रहावे लागते. पर्यायाने त्यांच्या खर्चात वाढ होते आणि उत्पन्न कमी होते. याशिवाय शेतकरी रेल्वेने जाऊन पुणे आणि नाशिक सारख्या ठिकाणी आपल्या शेतीमालाची थेट विक्री करू शकतात. एवढी मोठी क्रांती या पुणे-नाशिक रेल्वे घडवू शकते, म्हणूनच हा प्रकल्प होणे नितांत गरजेचे आहे.
वैज्ञानिक तज्ज्ञांची समिती तयार करून...
पुणे-नाशिक रेल्वे ही जुन्नर, संगमनेर, सिन्नर, आंबेगाव, खेड या भागाची जीवनदायी ठरणारी आहे, मात्र खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी (रेडिओ दुर्बिणीला) प्रकल्पाला अडथळा निर्माण होण्याचे कारण पुढे करून रेल्वे मार्गात बदल करण्यात आल्याने या मार्गावरील अनेक तरुणांची व शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळाली होती. दरम्यान, वैज्ञानिक तज्ज्ञांची एक समिती तयार करून जीएमआरटीला (रेडिओ दुर्बिणीला) धोका निर्माण न होता आधीच्या सर्वेक्षणानुसारच (संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड मार्गे) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प करण्यात येईल, अशी सकारात्मक घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने या भागातील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
पुणे-नाशिक रेल्वे हा केवळ एक रेल्वेमार्ग नसून खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतील जनतेने पाहिलेले अनेक वर्षांपासूनचे आर्थिक विकासाचे स्वप्न आहे. हा रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे या भागातील जनतेला विकासाचा हक्क नाकारण्यासारखे आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग आधीच्या आरेखनानुसारच व्हावा अशी माझी आग्रही भूमिका आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पुणे-नाशिक रेल्वेमार्ग करता येणं शक्य आहे, त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक विचार करावा.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा
पुणे-नाशिक रेल्वेप्रकल्पावर अनेक तालुक्यांचा विकास आणि लाखो नागरिकांचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे. हा रेल्वे प्रकल्प या भागातील अर्थकारणाला व पर्यायाने या भागातील विकासाला चालना देणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. पुणे-नाशिक रेल्वेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे या भागातील जनतेची खंबीरपणे बाजू मांडावी आणि हा रेल्वे प्रकल्प नाशिक, संगमनेर, आळेफाटा, मंचर, खेड, चाकण मार्गेच पूर्णत्वास न्यावा.
- सत्यजित तांबे, विधान परिषद आमदार, नाशिक
योग्य मोबदला स्वीकारून पुणे-नाशिक रेल्वेसाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनी देण्यासाठी बाधित शेतकरी सकारात्मक भूमिकेत आहेत.
- सुभाष खोकराळे, बाधित शेतकरी, हिवरे तर्फे नारायणगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.