दौंड, ता. ११ : गोपाळवाडी (ता. दौंड) येथे नागरी भागातील उकिरड्यावर प्लॅस्टिक बरण्यांमध्ये आढळलेले मृत अर्भक व मानवी अवयव सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध दाखल केलेला गर्भपाताचे कलम रद्द केले आहे. पंधरवड्यानंतर या प्रकरणात विविध वैद्यकीय अहवाल न आल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल न करता अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल आहे.
दौंड- कुरकुंभ राष्ट्रीय महामार्गालगत २५ मार्च रोजी जिजामाता नगर येथे प्लास्टिक बरण्यांमध्ये एक १८ ते २० आठवडे वय असलेले पुरुष जातीचे मृत अर्भक आढळले होते. तर, अन्य बरण्यांमध्ये शस्त्रक्रियादरम्यान काढलेले गर्भाशय, स्तन, वृषण, आदी मानवी अवयव आढळले होते. शहरातील दौंड- सिद्धटेक अष्टविनायक मार्गावरील ‘भंगाळे क्लिनिक अॅण्ड नर्सिंग होम’ या रूग्णालयाचे हे अर्भक व मानवी अवयव असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली होती.
याबाबत दौंड पोलिस ठाण्यात २५ मार्च रोजी अंमलदार महादेव जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ८९ (स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे), कलम ९० (गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडणे), कलम २७१ (जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असलेली निष्काळजीपणाची कृती) आणि कलम २७२ (संसर्ग पसरण्याचा संभव असलेली घातकी कृती करणे) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
याबाबत पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तपासात अर्भकाचा जन्म गर्भपातामुळे न झाल्याची माहिती मिळाल्याने या प्रकरणातील कलम ८९ व ९० रद्द केले आहे. जैववैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्याप्रकरणी संबंधितांविरूद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल आहे. डॅा. प्रतिभा प्रमोद भंगाळे यांना अर्भक निष्काळजीपणाने हाताळल्याने त्यांना नोटीस बजावली आहे. अवयव असलेल्या बरण्यांवरील नोंदींच्या आधारे शस्त्रक्रिया झालेल्या पाच जणांचे जबाब नोंदविले आहेत. मृत अर्भक व अर्भकाच्या आई व वडिलांची डीऑक्सिरिबो न्यूक्लिक ॲसिड (डीएनए) ही आनुवंशिक चाचणी करण्याकरिता नमुने घेण्यात आले आहेत.
अर्भकाविषयी गूढ कायम
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना ३० ऑगस्ट २०२० रोजी प्रसूती झाली. मृत अर्भक हे मुदतीपूर्वी जन्माला आल्याचा रूग्णालयाचा दावा आहे. परंतु, प्रसूतीनंतर या अर्भकाचे विहित पद्धतीने अंत्यसंस्कार न करता तब्बल साडेचार वर्षे रूग्णालयात ठेवण्यामागील कारणांचा समर्पक खुलासा अद्याप झालेला नाही. त्याचबरोबर साडेचार वर्षानंतर रूग्णालय प्रशासनाने एका भंगार संकलन करणाऱ्या व्यक्तीला हे अर्भक थेट उकिरड्यावर फेकण्यासाठी का दिला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. विनापरवानगी मानवी अवयव जतन केल्याने आरोग्य उप संचालक कार्यालयाकडून रूग्णालय प्रशासनाची चौकशी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.