दौंड , ता. २४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर - मुंबई - सोलापूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला दौंड जंक्शन रेल्वे स्थानकावर तब्बल पावणेतीन वर्षांच्या विलंबानंतर थांबा देण्यात आला आहे. कोणतीही सबब न सांगता थांबा नाकारणाऱ्या रेल्वे प्रशासनाला अखेर दौंड जंक्शन येथे थांबा द्यावा लागला आहे.
दौंड रेल्वे जंक्शन येथे सोमवारी (ता. २४) सकाळी ८ वाजून ८ मिनिटांनी सोलापूर-मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ दाखल झाली. दौंडकरांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक्सप्रेसचे स्वागत करून एक्सप्रेसचे चालक व सहचालक यांचा सत्कार केला. वंदे भारत एक्सप्रेसमुळे वेळेची बचत होणार असल्याने दौंड रेल्वे स्थानकावरून मुंबई व सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. दौंडबरोबर शेजारील बारामती, इंदापूर तालुक्यांसह श्रीगोंदा व कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील प्रवाशांना देखील या एक्सप्रेसचा लाभ होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस दौंड जंक्शन रेल्वे स्थानकावरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी रवाना होऊन पुणे-खंडाळा-कल्याण-ठाणे-दादर सेंट्रल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी दाखल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० फेब्रुवारी २०२३ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे लोकार्पण करण्यात आले होते. परंतु एक्सप्रेसला कोणतीही सबब न सांगता दौंड जंक्शन येथे थांबा नाकारण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल व श्रीगोंदा (जि. नगर) मतदारसंघाचे तत्कालीन आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी वेळोवेळी रेल्वेमंत्री यांच्याकडे थांब्याची मागणी केली होती. अखेर ३३ महिने आणि १४ दिवसांच्या विलंबाने थांबा मंजूर करण्यात आला.
दौंड जंक्शन येथील वंदे भारत एक्सप्रेसची वेळ :
मार्ग***आगमन***प्रस्थान***
सोलापूर-मुंबई***सकाळी ८.०८***८.१०
मुंबई-सोलापूर****रात्री ८.१३***रात्री ८.१५
तिकिट दर (प्रति व्यक्ती)
मार्ग***चेअर कार***एक्झिक्युटिव्ह चेअर कार
दौंड जंक्शन ते मुंबई***८५०***१५८०
दौंड जंक्शन ते सोलापूर***८१०***१३९०
दुसरी वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर (अजनी) - दौंड कॅार्ड लाइन स्टेशन - पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे १० ऑगस्ट २०२५ पासून नियमितपणे दौंड कॅार्ड लाइन स्टेशन येथे थांबत आहे. सोलापूर-मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड येथे २४ नोव्हेंबरपासून थांबा मिळाल्याने दौंड परिसरातून दोन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
4239
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.