दौंड, ता. २० : दौंड नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बारा तासांकरिता बदल करण्यात आला आहे. मतमोजणीकरिता निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.
नगरपालिका निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांनी माहिती दिली की, शहरातून जाणाऱ्या दौंड- अहिल्यानगर महामार्गावरील नगर मोरी स्थित शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणीकरिता १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणीकरिता एकूण ११० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता ५ पोलिस अधिकारी, ८० पोलिस अंमलदार आणि ३० गृहरक्षक दल जवान यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी दरम्यान आणि मतमोजणीनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
नगरपालिकेची मतमोजणी दौंड शहरातील नगर मोरी चौकात असल्याने रविवारी (ता. २१) पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दौंड नगर मोरी चौक ते अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. कुरकुंभ, बारामती व पुणे येथून येणारी वाहने दौंड रेल्वे उड्डाण पुलाकडे न वळता दौंड- पाटस अष्टविनायक मार्गावरील वायरलेस फाटा- नानवीज- सोनवडी फाटा मार्गे नदीवरील पुलाच्या दिशेने अहिल्यानगर कडे जातील. तर अहिल्यानगर येथून दौंडकडे येणारी वाहने सोनवडी फाटा- नानवीज- वायरलेस फाटा मार्गे पाटस- दौंड रस्त्याने दौंडच्या दिशेने येतील, अशी माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.