दौंड, ता. ३० : दौंड न्यायालयाजवळ राहणारे ज्येष्ठ वकील यांच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरा चोरीस गेला आहे. अज्ञाताने चार वाहनांचे नुकसान करीत कॅमेरा चोरला आहे.
दौंड पोलिसांनी मंगळवारी ( ता. ३०) याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ वकील गणपतराव बापूराव जाधव (वय ७०, रा. सुरभी अपार्टमेंट, दौंड न्यायालयाजवळ, लिंगाळी रस्ता, ता. दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. जाधव हे परगावी गेले असता २४ ते २७ डिसेंबर दरम्यान हा प्रकार झाला. जाधव कुटुंबातील सदस्यांच्या २ स्प्लेंडर प्लस, १ बुलेट व १ स्प्लेंडर, अशा एकूण चार वाहनांचे नुकसान करण्यात आले. अज्ञाताने जाधव राहत असलेल्या सुरभी अपार्टमेंटच्या वाहनतळामधील या चार वाहनांचे सीट धारदार वस्तूने फाडून टाकले. या दुचाकींच्या हॅण्डल जवळील वायरी कापून टाकून वाहनांचे नुकसान केले. वीजमीटरच्या वायर देखील तोडली. त्याचबरोबर सुरक्षेकरिता व वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आलेला १० हजार रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेरा देखील चोरून नेला आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
दौंड पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २७) जाधव यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.