दौंड, ता. १५ : दौंड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा व पंचायत समितीच्या चौदा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ३१७ मतदान केंद्र निश्चित केली आहेत. निवडणुकीसाठी २१ समन्वय अधिकारी, ३० क्षेत्रीय अधिकारी व २२९४ निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागा व पंचायत समितीच्या चौदा जागांच्या निवडणुकीकरिता दौंड महसूल उप विभागाचे प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, तर तहसीलदार अरुण शेलार सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. शुक्रवारपासून (ता. १६) दौंड शहरातील इरिगेशन कॅालनीमधील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती अरुण शेलार यांनी दिली.
निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, याकरिता सहा स्थिर पथके व सहा फिरते तपासणी पथके (फ्लाईंग स्क्वॅाड टीम) नियुक्त केली आहेत. त्याचबरोबर वाहने, बेहिशोबी रोकड, सोने किंवा किंमती धातू आदींची तपासणी करण्यासाठी सहा व्हिडिओ सर्वेक्षण पथकांची (व्हिडिओ सर्वेलन्स टीम) नियुक्ती केली आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यात सन २००७ व २०१२मध्ये पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक झाली होती. तर, २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत गणांची संख्या घटून १२ झाली होती. यंदा मात्र जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण वाढल्याने एकूण गटांची संख्या ७, तर गणांची संख्या १४ झाली आहे. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणूक होत असताना प्रचाराचा कालावधी अत्यल्प असल्याने मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.
तुलनात्मक संख्या
वर्ष सन २०१७ सन २०२६
स्त्री मतदारसंख्या १,०९,६७८ १,३२,६७९
पुरुष मतदारसंख्या १,२२,७२९ १,४०,४१४
तृतीयपंथी मतदार ५ ७
एकूण मतदारसंख्या २,३२,४१२ २,७३,१००
जिल्हा परिषद जागा ६ ७
पंचायत समिती जागा १२ १४
मतदान केंद्र २५७ ३१७