दौंड, ता. २४ : दौंड नगरपालिकेच्या एकमेव जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने ऐन उन्हाळ्यात हा तलाव बंद आहे. राज्य राखीव पोलिस दलाचा तलावही बंद असल्याने नागरिकांना यंदा पोहण्याचा आनंद घेता आलेला नाही.
शहरात तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, भीमा नदीतील जलपर्णीमुळे तिथे पोहणे अशक्य झाले आहे. नगरपालिकेच्या तलावासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत एका कंत्राटदाराने खोटी कागदपत्रे जोडल्याची तक्रार झाल्याने फेरनिविदा काढण्यात आली. मात्र, अद्याप मंजुरी न मिळाल्याने तलाव कुलूपबंद आहे. यामुळे काही तरुण जीव धोक्यात घालून राखीव वनक्षेत्रातील जुन्या साठवण तलावात जात आहेत.
सध्या तलावाच्या परिसरात घाण, शेवाळ आणि काटेरी झुडपे वाढली आहेत. सुरक्षारक्षकाअभावी या ठिकाणी मद्यपी आणि जुगारींचा वावर वाढला असून, परिसराची दुरवस्था झाली आहे. दोन कोटी ६२ लाख रुपये खर्चून बांधलेल्या या तलावाला सन २०१९मध्ये गळती लागली होती. प्रशासनाने दोन महिने आधीच प्रक्रिया राबवली असती, तर दौंडकरांना दिलासा मिळाला असता. स्थानिक राजकीय हितसंबंधांमुळे दोषी कंत्राटदारावर कारवाई टाळली जात असल्याची चर्चा आहे. फेरनिविदेमुळे तलाव आणखी १५ दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या मागण्या
पाणी नियमितपणे बदलावे व त्याचा डिजिटल अभिलेख तयार करावा.
पाण्यात क्लोरीनचे अतिरिक्त प्रमाण असल्याने पाण्याच्या नमुन्यांची नियमित तपासणी करावी.
चंद्रभागानगर किंवा जनता कॉलनीतून तलावासाठी स्वतंत्र रस्ता तयार करावा.
सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा अद्ययावत करावी.
जलतरण तलावापर्यंतच्या रस्त्यांवरील पथदिवे सुरू करणे व काटवनालगत पथदिवे बसविणे.
सुरक्षारक्षक म्हणून ज्येष्ठ नागरिकांऐवजी तरुण किंवा प्रौढ नियुक्त करावेत.
प्रमाणित महिला जीवरक्षक व सुरक्षारक्षक नियुक्त करणे.
वैशिष्ट्ये
३० गुंठे क्षेत्रात बांधकाम
बांधकाम खर्च- एकूण २ कोटी ६२ लाख ४२ हजार रुपये.
मुख्य जलतरण तलाव- ८२ फूट लांब, ३९ फूट रुंद व ८.२ फूट खोल
मुलांसाठी स्वतंत्रपणे बांधण्यात आलेला तलाव २९ फूट लांब, १९ फूट रुंद व ३ फूट खोल.
पोहण्यासाठी येणाऱ्या मुला- मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली पाहिजे. तलावाच्या परिसरातील गैरप्रकार बंद करावेत. मुले व मुलींची एकत्रित बॅच घेऊ नये आणि पोहण्याच्या वेळा मुलींच्या सोईच्या केल्या पाहिजेत.
- हर्षदा वूड, शिक्षिका
जलतरण तलावाची दुरुस्ती सुरू आहे. पहिल्या निविदा प्रकरणात खोटे कागदपत्रे जोडल्याची तक्रार आल्याने ती रद्द करून स्थायी समिती समोर विषय ठेवला होता. फेरनिविदा काढली आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर चार दिवसांत जलतरण तलाव खुला केला जाईल.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी, दौंड नगरपालिका
04584
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.