डोर्लेवाडी, ता. २७ : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील रयत शिक्षण संस्थेच्या जागा व इमारतीचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोडवला असून, कारखान्याने त्यांच्याकडे असलेली जागा संस्थेला देऊन संस्थेने इमारत बांधावी, अशा स्पष्ट सूचना भवानीनगर (ता. इंदापूर) येथे बुधवारी (ता. २७) झालेल्या शेतकरी मेळाव्यात दिल्या.
दरम्यान, अनेक दिवसांपासून शाळा इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने नवीन बांधून मिळणे बाबत ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे अभिनंदन केले. येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय कारखान्याच्या मालकीच्या इमारतीमध्ये मागील ५० वर्षापासून सुरू आहे. दरम्यान, शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने ती बांधून मिळावी, अशी मागणी मागील सात ते आठ वर्षापासून ग्रामस्थ रयत शिक्षण संस्था व कारखान्याकडे करत होते. मात्र, याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नव्हती. सन २०२२ मध्ये ‘छत्रपती’च्या सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याकडे असणारी जागा ग्रामपंचायतीस देण्याबाबत ठराव केला होता. त्यानंतर संचालक मंडळाने कायदेशीर बाबीची पूर्तता करून ग्रामपंचायतीस खरेदीखत करून देण्याचे कबूल केले होते. त्यानुसार दस्ताची शासकीय रक्कमही ग्रामपंचायतीने मार्च २०२५ मध्ये जमा केली होती. मात्र, ऐनवेळी खरेदी दस्तावर सह्या करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळातील अधिकारी व पदाधिकारी आले नसल्यामुळे जागेचा व इमारतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, त्याचबरोबर विविध संस्था, संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी यांनी नूतन संचालक मंडळ यांना जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लेखी निवेदन देऊन विनंती केली होती. मात्र, संचालक मंडळ नवीन असल्याने त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नव्हता.
शाळेची दुरवस्था व कोणाकडूनही ठोस निर्णय होत नसल्याने शनिवारी (ता. २३) शाळेचे माजी विद्यार्थी व पालकांनी शाळेमध्ये बैठक घेऊन आठ दिवसात निर्णय न झाल्यास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत ‘सकाळ’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्यानंतर मंगळवारी (ता. २६) कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व संचालक मंडळ यांनी भवानीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन शाळेचा निर्णय येणाऱ्या २८ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतरही पालक आंदोलन करण्याच्या भूमिकेमेवर ठाम होते.
मात्र, भवानीनगर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट भूमिका घेऊन कारखान्याकडे असलेली शाळेची सर्व ८१ गुंठे जागा रयत शिक्षण संस्थेला देण्याबाबत संचालक मंडळाला सूचना केल्या. मागील वर्षी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जाहीर केलेला ३ कोटी रुपयांचा निधी व रयत शिक्षण संस्थेचा दीड कोटी रुपयांच्या निधीतून शाळेच्या २४ खोल्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, असे सांगितले. कमी पडणारी रक्कम स्वतः देणार असल्याचे कबूल केल्याने डोर्लेवाडी येथील शाळेची जागा व इमारतीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शाळेचे पालक व इतर संस्था व संघटनेचे पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घातल्यामुळे शाळेचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता रयत शिक्षण संस्था व छत्रपती कारखाना यांनी तांत्रिक बाबी पूर्ण करून जागा हस्तांतर व इमारत बांधकामास लवकर सुरुवात करावी, अशी मागणी शाळेचे विद्यार्थी पालक यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.