देऊळगाव राजे, ता. १ : सोशल मिडीयावर (इंस्टाग्रामवर) दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकूर पाठवणाऱ्या देऊळगाव राजे (ता. दौंड) तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्यामध्ये देण्यात आली.
देऊळगाव राजे येथील खुशीलाल घनशाम सहाणी (वय २१), राजेश प्यारेलाल सहाणी (वय ३५, मूळ रा. तेलीयाडीया, पो. तेलपुरखा जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश), मीर हसन मोहम्मद मक्सुदमिया अली (वय २८, रा. भगवानपूर, जि. कैमूर, बिहार) या तिघांनी त्यांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडीया अकाउंटवरून दोन जाती धर्मात तेढ निर्माण होईल, अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यांच्या अशा कृत्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व समाजामध्ये शांतता राहावी म्हणून त्यांना तत्काळ अटक करून विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलिस अधीक्षक बारामती यांच्याकडे हजर केले. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर करून येरवडा कारागृह येथे त्यांची रवानगी करण्यात आली.
सोशल मिडीयावर समाजात तेढ निर्माण करणारे, द्वेष पसरवणारे किंवा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आला.