घोडेगाव, ता. २७ : इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करा, २४ टक्क्यांप्रमाणे वार्षिक परतावा देतो, असे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवाजी गाडे यांनी तक्रार दिली आहे. घोडेगाव परिसरातील अनेक नागरिकांनी यात पैसे गुंतवल्यामुळे करोडो रुपयांची फसवणूक झाले असल्याचे दिसून येते.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी माहिती दिली की, याप्रकरणी सिद्धेश मनोज काळे (रा. कोलदरे, ता. आंबेगाव), गणेश दत्तात्रेय गव्हाणे (रा. साल, बाभुळवाडी, ता. आंबेगाव) व राहुल दिलीप काळे (रा. शिंदेवाडी, ता. आंबेगाव) या तीन जणांवर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घोडेगाव येथे सिद्धेश काळे व गणेश गव्हाणे हे इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीमार्फत शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करत होते. सन २०२२च्या दरम्यान सिद्धेश काळे व गणेश गव्हाणे यांनी शिवाजी गाडे यांची भेट घेऊन, ‘आमच्या कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करा, तुम्हाला २४ टक्क्यांप्रमाणे वार्षिक परतावा देतो,’ असे सांगून गुंतवणूक करून घेतली. घोडेगावमधील अनेक लोकांनी यामध्ये गुंतवणूक केली. त्याप्रमाणे गाडे यांनी सन २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान २६ लाख रुपयांची आर.टी.जी.एस.द्वारे गुंतवणूक केली. परंतु, त्यांना परतावा न भेटल्याने त्यांनी चौकशी केली असता सिद्धेश काळे हा मुंबईला गेला असल्याचे समजले. त्याची मुंबई येथे भेट घेतली. त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता तेथे सिद्धेश काळे व राहुल काळे यांनी शिवीगाळ व दमदाटी करत पैसे देण्यास नकार दिला.
दरम्यान, संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या इतर सात लोकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून १ कोटी २ लाख ९२ हजार ३०१ रुपये व २६ लाख रुपये, असे एकूण १ कोटी २८ लाख ९२ हजार ३०१ रुपये इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीमध्ये सिद्धेश काळे व गणेश गव्हाणे यांनी गुंतवणूक करायला सांगून या पैशांवरील २४ टक्क्यांप्रमाणे वार्षिक परतावा न देता आणि गुंतवणूक केलेले पैसे न देता आर्थिक फसवणूक केली असल्याचे शिवाजी गाडे यांनी तक्रारीमध्ये नमुद केले आहे. तसेच, गुंतवणूक केलेली रक्कम सिद्धेश काळे यांनी आई, वडील, भाऊ व पत्नी यांच्या वेगवेगळ्या बॅंकमधील अकाउंटवर टाकले असल्याचे गाडे यांनी सांगितले.
तक्रार करण्याचे आवाहन
इडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनी कार्यालय घोडेगाव येथे ज्या नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांना गुंतवणुक केलेले पैसे परत मिळाले नसतील त्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.