घोडेगाव, ता. १७ : आंबेगाव तालुक्यातील दुर्गम खेतेपठार येथे रस्ता उपलब्ध नसल्याने, उपचाराअभावी आदित्य विकास घनकुटे या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा सोमवारी (ता. १६) मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ओढवलेल्या या प्रसंगामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता जेवताना आदित्यला अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. काही वेळाने शुद्धीवर आला, पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला रुग्णालयात नेणे आवश्यक होते. मात्र, गावात पक्का रस्ता नसल्याने आई सुनीता आणि आजी शारदा यांनी त्याला पाठीवर घेऊन चार किलोमीटरचा डोंगरदऱ्याचा रस्ता पायी पार केला. आमोंडी येथून काका दत्तात्रेय खमसे यांनी दुचाकीवरून त्याला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
‘‘वेळेत रस्ता आणि उपचार मिळाले असते, तर माझा मुलगा वाचला असता,’’ अशी खंत वडील विकास घनकुटे यांनी व्यक्त केली. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पक्का रस्ता करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
खेतेपठार ते आमोंडी हा रस्ता वनविभागाच्या हद्दीत असल्याने प्रलंबित आहे. पावसाळ्यात कच्चा रस्ता वाहून गेल्याने येथील दळणवळण पूर्णपणे विस्कळित झाले आहे.
खेतेपठार ते आमोंडी हा चार किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता वन खात्याच्या हद्दीतून असल्यामुळे रस्ता होण्यासाठी अडचणी आहेत. या रस्त्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीच वन विभागाला दिला आहे. हा रस्ता होण्यासाठी पाठपुरावा करू. हा रस्ता झाल्यास येथील लोकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटेल.
- धनंजय फलके, उपसरपंच, आमोंडी
दृष्टिक्षेपात
दुर्गम भागात रस्त्यांचा अभाव जीवघेणा ठरत आहे.
आरोग्यसेवा पोहोचण्यात मोठी दिरंगाई.
प्रशासनाच्या विकास दाव्यांवर प्रश्नचिन्ह.
तत्काळ पक्का रस्ता व मूलभूत सुविधा देण्याची मागणी.
04837
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.