घोडेगाव, ता. २८ ः कानसे (ता. आंबेगाव) येथे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सायंकाळी कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला होता. या आखाड्यात राज्यभरातून आलेल्या पहिलवानांनी रोमहर्षक कुस्त्यांच्या माध्यमातून धुरळा उडवून दिला. विशेष म्हणजे आखाड्यात पुरूषांसह महिला पहिलवानांचाही लक्षणीय सहभाग होता. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चाललेल्या आखाड्यात विजयी पहिलवानांनी रोख रकमांसह आकर्षक पारितोषिके देण्यात आली. विजय पवार (पुणे) याने गोवर्धन शिंदे (नगर) याला आस्मान दाखवून प्रथम पारितोषिक पटकावले. अंकित धुळगडे (नगर) याने अमर जगदाळे (पुणे) याला चारी मुंड्या चित करत द्वितीय पारितोषिक पटकावले. महेश सूळ (नगर) याला आस्मान दाखवून विराज घेरंडे (पुणे) याने तृतीय पारितोषिक पटकावले. आकाश चव्हाण (पारनेर) हा रोहिदास आजबे (नेवासा) याला चितपट करून चौथ्या पारितोषिकाचा मानकरी ठरला.
विशाल वाळुंज (कुरूळी) याने यश मोहिते (शेल पिंपळगाव) याच्या चारी मुंड्या चित करत पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. जादू शिर्के (चऱ्होली) हा निलेश इंगळे (शेल पिंपळगाव) याला आस्मान दाखवून सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला. अक्षय मुळुक यांनी कुस्त्यांचे सूत्रसंचलन केले. वैभव कराळे आणि अविनाश मुळुक यांनी पंच म्हणून काम पाहिले.
दरम्यान, रात्री लहान आणि मोठ्या गटासाठी आयोजित केलेल्या नृत्य स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमांसह आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. यात्रोत्सवासाठी श्रीकाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, श्रीकाळभैरवनाथ धर्मदाय संस्था, श्रीकाळभैरवनाथ ग्रामविकास मंडळ तसेच वाड्या-वस्त्यांतील मंडळांसह गाव आणि पंचक्रोशीतील तरूण कार्यकर्ते, महिला आणि अबालवृद्धांनी परिश्रम घेतले.
हेवीवेट मल्लांचा सहभाग
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून तब्बल ११ हेवीवेट मल्लांसह कुस्त्यांच्या मैदानात गाजलेल्या अन्य २७ मल्लांची उपस्थितीत लक्षणीय ठरली. विशेष म्हणजे आखाड्यात मल्ल तरूणींच्या कुस्त्याही लक्षणीय ठरल्या. २ लाख २० हजार रोख रक्कमांसह ढाली, गदा आणि आकर्षक सन्मानचिन्हांनी विजयी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
२ कुस्तीतील एक क्षण.
.......
चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.