गराडे, ता. ४ : पुरंदर तालुक्यातील अंजीर बागांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. फळांचा दर्जा घसरला आहे. सततच्या पावसामुळे फळांचा कडकपणा जाऊन ती उकलत होऊन खराब होत आहेत. पावसामुळे तालुक्यातील शेकडो हेक्टर बागा पूर्णपणे धोक्यात आल्या आहेत.
चांगल्या प्रतिच्या अंजिराला १०० रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळायचा. तो आता घसरून ४० रुपये किलोपर्यंत आला आहे. पावसामुळे फळांवर तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. ज्यामुळे फवारणीचा एकरी खर्च वाढला आहे. सततचा पाऊस व ढगाळ हवामानाचा फळबागांना फटका बसला आहे.
अंजिराला एकरी साधारण एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो. सध्या खटट्या हंगामाला सुरुवात झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला बाजारभाव मिळत असतानाच ढगाळ हवामान आणि मागील आठवड्यात झालेला पाऊस, यामुळे मालाचा दर्जा कमी झाला आहे. मुंबई बाजारपेठेत चार डझनाच्या एक बॉक्सला सुमारे १५० ते २०० रुपये बाजारभाव मिळत आहे. काही शेतकरी स्थानिक बाजारपेठेत आपला माल विकत तेथेही बाजारभाव घसरले आहेत. शिवाय तोडणी केलेला माल उकलल्याने अगदी ४० टक्के माल फेकून द्यावा लागत आहे, रोगाचा प्रादुर्भाव व खराब माल टाकून द्यावा लागल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून आहे. परिणामी मुळी बंद पडली आहे. बुरशीचे प्रमाण वाढले आहे. पाने पिवळी पडली आहेत. हरित द्रव्ये तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाऊस उघडल्यानंतर थोडे फार ऊन पडल्यावर आपल्याला पहिल्यांदा पाण्यात विरघळणारे ९० टक्के गंधक ठिबकद्वारे किंवा पाट पाण्यातून एकरी तीन किलो सोडावे, असे हरेकृष्ण कृषी सेवा केंद्र दिवे येथील नितीन जाधव यांनी सांगितले.
फळमाशीचा प्रादुर्भाव
अंजीर उत्पादक शेतकऱ्यावर अवकाळीची कुऱ्हाड कोसळली असतानाच फळमाशीचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात. तसेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला फळ सेटिंग झाल्यानंतर कामगंध सापळे वापरावे. तसेच मिओथ्रीन या कीटकनाशक आणि कोळीनाशकाची फवारणी करावी. अंजीर उकलू नये म्हणून प्रतिलिटर पाण्यामध्ये दीड ग्रॅम बोरॉन मिसळून फवारावे आणि कल्शिअम नायट्रेट पाच ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
12023
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.