गराडे, ता. ३१ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कात्रज, पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वनपुरी (ता. पुरंदर) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘युथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्पेशल फोकस ऑन वॉटर मॅनेजमेंट अँड वेस्ट’ या संकल्पनेवर आधारित हे शिबिर शनिवार २० ते शुक्रवार २६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पाणी अडवा- पाणी जिरवा या संकल्पनेनुसार पाणीसाठ्यासाठी समतोल चर खोदणे, श्रमदान, तसेच आरोग्य शिबिरे, असे उपक्रम राबविण्यात आले. डॉ. प्रकाश कदम यांनी शाश्वत परिसंस्था विकासासाठी वृक्षारोपण व मृदा आर्द्रता संवर्धनावर सखोल मार्गदर्शन केले, तर मा. ॲड. सागर घोळवे यांनी भारतातील जमीन मालकी, कायदे, हक्क, जबाबदाऱ्या व कायदेशीर प्रक्रिया याविषयी विद्यार्थ्यांना मूलभूत माहिती दिली. तसेच प्राचार्या डॉ. शिंदे यांचे लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन या विषयावर व्याख्यान झाले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना व्यायाम, योगासने, बौद्धिक उपक्रम, शिबिरासाठी महाविद्यालयातील कॉमर्स विभागप्रमुख डॉ. शीतल लकडे, संगणक विभागप्रमुख डॉ. सोनाली घोळवे, सहाय्यक प्रा. साक्षी मुंडे, प्रा. सायली दरेकर, प्रा. मयुरी पानसरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोती पाटील व सहाय्यक अधिकारी प्रा. राजेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पाडले. शिबिर यशस्वी होण्यासाठी वनपुरी गावाच्या सरपंच राज्यश्री कुंभारकर, उपसरपंच प्रताप कुंभारकर, सदस्य वैशाली कुंभारकर, सुजित कुंभारकर, सुनीता कुंभारकर, सुजाता कुंभारकर, तंटामुक्ती अध्यक्ष म्हस्कु गोळे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना निवासाची आणि त्यांना लागणारी प्रत्येक सोई उपलब्ध करून देण्यात नामदेव कुंभारकर माजी सरपंच, लंकेश महामुनी माजी उपसरपंच यांचे सहकार्य लाभले. सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर व अनुज नहार यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळाले.
12350