गुनाट, ता. ३ : दुष्काळग्रस्त गाव ते तालुक्यात सर्वाधिक शिक्षक घडविणारे गाव ही ‘करडे’ची (ता. शिरूर) ओळख तालुक्याच्या शैक्षणिक पटलावर आजही पहिल्या क्रमांकावर अबाधित आहे. आजमितीला गावात एकूण ७८ शिक्षक तर २८ शिक्षिका असे एकूण १०६ शिक्षक आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे व भौगोलिकदृष्ट्या सर्वात उंचावर असणारे तालुक्यातील गाव अशी करडेची मुळ ओळख आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण, त्यामुळे जिरायती शेती हेच येथील शेतकऱ्यांचे जगण्याचे मुख्य साधन होते. स्वातंत्र्यपूर्व काळात साधारण १९३२ साली तुकाराम खोमणे हे गावातील पहिले शिक्षक झाल्याची नोंद आहे. त्याकाळी गावातील रतनबाईंच्या वाड्यात शाळा भरत असे. खोमणे यांच्यामुळे गावात शिक्षणाची अनेकांना हळूहळू गोडी लागली. गावात शिक्षणाचा पाया तयार झाला तरी उच्च शिक्षणासाठी गावापासून १२ किलोमीटरवर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत असे. त्या काळात प्रवासाची साधने अत्यल्प असल्याने अनेकांनी शिक्षणाचा हा प्रवास कधी पायी, कधी बैलगाडीने तर कधी सायकलवर केला. त्यामुळेच सुरुवातीच्या काळात किसन जगदाळे, आबासाहेब लोखंडे, दादासाहेब झिंजुर्के, ज्ञानदेव लंघे, बबन बांदल, शिवाजी वाळके असे शिक्षक गावातून घडले गेले. एक पिढी सुशिक्षित झाल्याने सहाजिकच याच पिढीने दुसरी पिढी घडविण्याचे काम इमानेइतबारे केले. यात सुदैवाची बाब म्हणजे १९७० साली गावातच श्री भैरवनाथ विद्यालयाची स्थापना झाली आणि येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळाले. उच्च दर्जाचे आणि शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले शिक्षक, कडक शिस्त आणि तेवढ्याच तोलामोलाचे शैक्षणिक आस असलेले विद्यार्थी. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत राहिली. मुलांच्या बरोबरीने पालकांनी मुलींनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे १९७० पर्यंत पाच दहा शिक्षक असणाऱ्या करडे गावांत पुढील तीस वर्षांत जवळपास शंभरच्या पुढे शिक्षक, शिक्षिका घडल्या. आजही हा आकडा तालुक्यातील इतर कोणत्याही गावांपेक्षा सर्वात जास्त आहे.
शैक्षणिक संघटनेतही दबदबा
तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या जिल्हा व राज्य पातळीवर सोडविण्यासाठी पदवीधर आणि केंद्रप्रमुख, अखिल भारतीय शिक्षक तसेच प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अशा चार संघटना कार्यरत आहेत. योगायोग म्हणजे या चारही संघटनेचे अध्यक्षपद गावांतील अनुक्रमे एकनाथ जगदाळे, शिवाजीराव वाळके, बापूसाहेब लांडगे, सतीश पाचर्णे या गावांतील चार अध्यक्षांनी बजावत संघटनेच्या माध्यमातून प्रशासनावर शैक्षणिक पकड ठेवली आहे.
जावई व सुनाही शिक्षकच
गावांतील २८ च्या आसपास मुली शिक्षिका आहेत. सहाजिकच गावालाही तब्बल २८ शिक्षक जावई मिळाले आहे. तर ४१ मुली शिक्षिका सुना म्हणून गावात आल्या आहेत. गावांतील मुळ १०६ शिक्षक, ३० जावई शिक्षक, ४१ शिक्षक सुना असे एकूण १७७ शिक्षक करडे गावांत असल्याने हे गाव शिक्षकमय झाले आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी गावात शिक्षणाशिवाय पर्यायच नव्हता. शिक्षण घेऊन लवकरात लवकर नोकरीला लागणे हेच उद्दिष्ट असायचे. त्या काळी आधी दहावी व पुढे बारावी नंतर डी. एड. हा शैक्षणिक कोर्स करणे हाच आर्थिकदृष्ट्या सोपा मार्ग होता. पालकांची दूरदृष्टी, शिक्षकांची मेहनत व विद्यार्थ्यांचे कष्ट यामुळेच गावात १०६ शिक्षक घडले. शिक्षकी पेशातून भावी पिढी घडविण्याचे काम करडे येथील शिक्षक इमानेइतबारे करत आहेत. तालुक्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा वाढविण्यात गावांतील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, याचा सार्थ अभिमान आहे.
- शिवाजी वाळके, अखिल भारतीय शिक्षक संघटना, माजी जिल्हाध्यक्ष, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.