गुनाट, ता. १५ ः शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांच्या जोरावर अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या पाचर्णे वस्ती (करडे, ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेला पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक स्पर्धेत लहान गटात द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे. मागील वर्षी याच शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ शाळा हा पुरस्कार मिळाला होता. सलग दोन वर्षात दोन्ही मानाचे पुरस्कार मिळवणारी तालुक्याच्या शाळांमधील ही पहिलीच शाळा ठरली आहे.
पाचर्णे वस्तीवरील जिल्हा परिषद शाळा ही तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील आमूलाग्र बदलाचे उत्कृष्ट उदाहरण बनले आहे. दोन वर्षांपूर्वी येथे असणारा केवळ दहा विद्यार्थ्यांचा हजेरी पट, भौतिक सुविधांचा अभाव, इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा, त्यामुळे घटलेली विद्यार्थी संख्या; अशा अनेक अडचणींमुळे शाळेपुढे आपले अस्तित्व टिकविण्याचे मुख्य आव्हान होते. मात्र, कर्डेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला देशपातळीवर नावलौकिक मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका बेबीनंदा सकट यांची दोन वर्षांपूर्वी पाचर्णे वस्ती शाळेवर नेमणूक झाली. त्यांनी पालक, ग्रामपंचायत, लोकसहभाग, शालेय व्यवस्थापन समिती, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधील सीएसआर आदींच्या माध्यमातून शाळेचे रूपडेच पालटले.
शाळेत संगणक, शौचालय, बोलक्या भिंती, परस बाग, सेंद्रिय शेती, क्रीडा साहित्य अशा भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या. तर वाचन, गायन, सुंदर हस्ताक्षर, अवांतर वाचन, सर्वसामान्य ज्ञान, परिपाठ यांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण प्रगती होत गेली. अथक प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा व जिल्हा परिषद अध्यक्ष चषक या दोन्ही पुरस्काराच्या निकषात ही शाळा केवळ दोनच वर्षांत पात्र ठरत पुरस्काराने सन्मानित झाली. सद्यपरिस्थितीत ही शाळा शंभर टक्के कलानिपून आहे.
झिरो एनर्जी शाळा
आयटीसी व कल्याणी टेक्नोफोर्ज या कंपनींचे सीएसआर निधी व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून संपूर्ण शाळेसाठी सोलर सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्यावर शालेय कामासाठी लागणारी वीज येथे सहज आणि विनाअडथळा उपलब्ध झाली आहे. परिणामी ही शाळा झिरो एनर्जी शाळा बनली आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, बौध्दिक गुणवत्तेला चालना देणारे वेगवेगळे उपक्रम राबवणे, शिस्त आणि संस्कार यांतून भावी पिढीसाठी दर्जेदार विद्यार्थी तयार करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही आमच्या ध्येयाशी शंभर टक्के प्रामाणिक असल्याने दोनच वर्षांत शाळेला मिळालेले दोन महत्त्वाचे पुरस्कार हीच आमच्या कामाची व ग्रामस्थांनी ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे. याकामी सहकारी शिक्षक संभाजी जगताप व दत्तात्रय सकट यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
- बेबीनंदा सकट, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा, पाचर्णे वस्ती.