गुनाट, ता. १६ : करडे (ता. शिरूर) येथील भाऊसाहेब पळसकर यांच्या अडीच एकरातील कांद्याच्या पिकात पाणी साचले. मुसळधार पावसाचे पाणी सोमवारी (ता. १५) शेतात शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील कांदा उत्पादकांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पळसकर यांनी चांदवड जातीच्या कांद्याची आठवड्यापूर्वीच लागवड केली होती. त्यासाठी रान आखणी, खतांचा बेसल डोस, लागवडीची मजुरी यासाठी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. मात्र लागवडीनंतर आठच दिवसांत याच कांद्याच्या शेतात मुसळधार पावसामुळे पाणी साठले. साठलेल्या पाण्यामुळे कांद्याला मुळकुज, करपा या बुरशीजन्य रोगराईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, कांद्याच्या पडत्या बाजारभावाने एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे निसर्गाच्या पुन्हा नुकसानीला सामोरे जायची वेळ आली आहे.
निमोणे, न्हावरे मंडलात सोमवारी ७०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावरून या भागातील पावसाची आणि शेतमालाच्या झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात येते. नुकसानीमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या पाठबळ देण्यासाठी पिकांचा पंचनामा करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
- भाऊसाहेब पळसकर, नुकसानग्रस्त शेतकरी. करडे.
00252