इंदापूर, ता. ६ : उजनी धरणाच्या पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या अवैध वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर महसूल प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली असून, माळवाडी येथे उजनी पात्रात अवैध वाळू उपसा करणारी बोट जिलेटीनच्या स्फोटाने उडवत धरण पात्रातच नष्ट केली.
इंदापूर तालुक्याला लागून उजनी धरणाचे विस्तीर्ण पात्र आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूच्या रूपाने काळे सोने आहे. गेल्या काही दिवसांपासून उजनी पट्ट्यात महसूल प्रशासनाकडून वारंवार कारवाई केली जात असताना रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरूच असल्याने वाळू चोरांच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळणे महसूल प्रशासनाकडे आव्हान बनले आहे. दरम्यान, महसूल विभागाने सोमवारी (ता. ४) इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली माळवाडी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये नायब तहसीलदार अविनाश बनसोडे, मंडलाधिकारी औदुंबर शिंदे, ग्राममहसूल अधिकारी अशोक पोळ, वैभव मुळे, भोसले, पोलिस पाटील सुनील राऊत, अरुण कांबळे, अमोल व्यवहारे, संग्राम बंडगर, दत्ता पोळ, मल्हारी मखरे यांनी सहभाग घेतला.