इंदापूर, ता. २ : इंदापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७९.८९ टक्के मतदान झाले. शहरातील २७ मतदान केंद्रांवर काही ठिकाणी झालेले किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. काही मतदान केंद्रांवर वेळ संपताना मतदारांनी रांगा लावल्याने रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती. एकूण २४८२९ मतदारांपैकी १९८५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी प्राथमिक माहिती इंदापूर नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
इंदापूर नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शहरातील २७ मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावत मतदानासाठी गर्दी केली होती. प्रत्येक दोन तासाला सरासरी २० टक्के मतदान झाले. मतदान केंद्रापासून निर्धारित केलेल्या अंतरावर प्रमुख पक्ष व उमेदवारांनी नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना मतदार यादी, तसेच मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून साह्य केले. शहरातील विविध मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
यावेळी वृद्ध, दिव्यांग यांना मतदानासाठी मतदानाचे अधिकारी तसेच कार्यकर्ते मदत करताना पाहायला मिळाले. उन्हाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर पाण्याची तसेच सावलीचीही व्यवस्था केली होती.
पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एका मतदान केंद्रावर एका अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते. तसेच वरिष्ठ अधिकारी प्रत्येक मतदान केंद्राला भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेत होते.
दोघांकडून विजयाचा दावा
अटीतटीच्या मतदानात नंतर कृष्णा भीमा विकास आघाडीचे प्रदीप गारटकर यांनी विजय हा आपलाच असल्याचे सांगितले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरत शहा यांनीही आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला. मतदान संपल्यानंतर दोन्ही बाजूंकडून फटाक्यांची आतषबाजी करीत विजय आपलाच असल्याचा दावा करण्यात आला.
सखी केंद्राने वेधले लक्ष
इंदापूर शहरात उल्लेखनीय बाब म्हणजे मतदानात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याने शहरातील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र स्थापन केले होते .त्याठिकाणी आकर्षक रांगोळी काढली होती. मतदान केंद्रावर सर्व कामकाज महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडले. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट्स उपक्रमालाही महिला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकूण मतदारसंख्या : पुरुष- १२१८८, महिला- १२६३४, इतर- ७, एकूण- २४८२९
झालेले मतदान : पुरुष- ९७७०, महिला- १००८४, इतर- ३, एकूण- १९८५७
मतदानाची टक्केवारी : ७९.९७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.