इंदापूर, ता. १२ : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेस प्रारंभ कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक सागर मारकड यांच्यासह भारतीय सैनिक प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केलेल्या गणेश किसवे व ओम क्षिरसागर तसेच मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्वलन करून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसह स्थापन करण्यात आली.
त्यानंतर मैदान पूजन करून सुरू केलेल्या क्रीडा स्पर्धेत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ॲरोबिक्स डान्स सादर करत खेळमय वातावरण निर्माण केले. तसेच मोठ्या गटाच्या विद्यार्थ्यांनी फनी गेम खेळत मुलांना खेळामधील अचूकपणाचा गुण दाखवला. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सॅक रेस स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी कुस्तीपटू प्रशिक्षक सागर मारकड यांनी मुलांना मोबाईल टीव्ही पेक्षा मैदानी खेळाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. तर मेजर गणेश किसवे, ओम क्षीरसागर यांनी भारतीय सैन्य भरती संदर्भात मुलांना माहिती दिली. मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी स्पर्धेत खिलाडी वृत्ती आणि नियम याबद्दल मार्गदर्शन करत, खेळाचे महत्त्व सांगितले. या विविध स्पर्धेत प्रशालेतील सर्व खेळाडूंनी उत्साहात भाग घेतला.
यावेळी संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना खंदारे यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.