इंदापूर, ता. ३० : इंदापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागांतील आणि पुणे- सोलापूर महामार्गावरील विविध हॉटेल- ढाबे यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देत सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या तयारी केल्या आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, यासाठी इंदापूर पोलिस प्रशासनाच्या नियोजन केले आहे .दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या डीजे-साउंडवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिली. शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या चौकांवर, मुख्य रस्त्यांवर तसेच वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर दंड, वाहन जप्ती व परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. साध्या गणवेशात पोलिस कर्मचारी गस्त घालणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी डीजे, मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम, फटाके किंवा ध्वनिप्रदूषण होईल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. संवेदनशील, गर्दीची व संभाव्य गोंधळाची ठिकाणे ओळखून तेथे फिक्स पॉइंटवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. तसेच रात्रीच्या वेळी मोबाइल पेट्रोलिंग वाढवण्यात येणार असून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.असेही नाळे यांनी सांगितले.
–