जुन्नर, ता. ९ : जुन्नर शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नगर पालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अशुद्ध स्वरूपात होत असून, पिण्याच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत आहे. नळावाटे येणारे पिवळसर रंगाचे पाणी नागरिकांना पिण्याकरिता वापरावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून पाणी वापराबाबत नागरिकांना कोणतीही सूचना देण्यात आली नसल्याची तक्रार माजी नगरसेवक मधुकर काजळे यांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली.
कुकडी नदीपात्रातील साठवण बंधाऱ्यातून जुन्नर नगर पालिका नागरिकांना पाणी पुरवठा करते. उन्हाळ्यात या बंधाऱ्यातील पाणी संपल्यावर माणिकडोह धरणातून पाणी सोडले जाते. हे पाणी पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथे पाण्यावर आवश्यक प्रक्रिया केल्यानंतर शुद्ध झालेले पाणी नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना देण्यात येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना अत्यंत अशुद्ध स्वरूपात दुर्गंधीयुक्त वास येणारे पाणी मिळत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत.
नगर पालिकेने पाणी शुद्धीकरणाच्या कामासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. ठेकेदारामार्फत जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाते. संबंधित ठेकेदाराच्या ठेक्याची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपली आहे. त्यामुळे, तसेच बिल थकल्याने त्याने काम थांबल्याचे सांगण्यात येते. यामुळे पाण्यात शुद्धीकरणासाठी टीसीएल, तसेच क्लोरिनचा वापर होत नसल्याचे दिसून आले आहे. नगर पालिकेने पाणी गाळून उकळून वापरण्याबाबत नागरिकांना सतर्क करणे गरजेचे असल्याचे काजळे यांनी सांगितले.
पाणी साठवण बंधाऱ्यातील पाणी संपल्यावर माणिकडोह धरणातून पाणी सोडले जाते. धरणातील पाणीसाठा तळाशी गेल्याने, तसेच पाणी वाहत येत असताना त्यात माती, कचरा वाहून येतो. हे पाणी शुद्ध करून नंतरच नागरिकांना पुरविण्यात यावे.
- मधुकर काजळे, माजी नगरसेवक
जुन्नर शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांनी पिण्याचे पाणी गाळून व उकळून वापरावे.
- ज्ञानेश्वर गुणवरे, प्रमुख, मलनिस्सारण व पाणी पुरवठा योजना, जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.