जुन्नर, ता. ७ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष समीर मोरे यांनी केली आहे. याबाबत जुन्नर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे. आळेफाटा व आळेफाटा परिसरात अवैध जुगार, हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हे अवैध धंदे रात्री खूप उशिरापर्यंत चालत असून, त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे. अनेक तरुण मुले व्यसनी होत चालली आहेत. तसेच रात्री चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. महिलांना रात्रीच्या वेळी घराचे बाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. काही अवैध धंदे पिंपळवंडी स्थानक, कालव्याशेजारी आहेत. हे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावेत अशी मागणी मोरे यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.