जुन्नर, ता. २७ : लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी (ता. २७) ‘श्रीं’चा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासून गर्दी केली होती. दिवसभरात भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, विश्वस्त जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक, महापूजा करण्यात आली. ‘गिरीजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस आणि मंदिर परीसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. सकाळी मंदिरात नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
माणिकडोह येथील लक्ष्मण जाधव यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिरात सकाळी ६, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले. यावेळी गोविंद मेहेर, शंकर ताम्हाणे, भगवान हांडे, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, रोहिदास बिडवई, नीलेश सरजिने उपस्थित होते.