खळद, ता. ३ : खळद (ता. पुरंदर) येथे पारंपरिक पद्धतीने दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्तींची पालखीतून ग्राम मिरवणूक काढण्यात आली.
खळद येथे नऊ दिवस भैरवनाथ मंदिरामध्ये नित्य नियमाने अभिषेक, महापूजा करण्यात आली. सायंकाळी महाआरती, जागर असे विविध कार्यक्रमांचे माध्यमातून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची सकाळी घट उठवून सांगता केली. सायंकाळी नाथांची पालखी सीमोल्लंघनासाठी गावच्या बाजूला असणाऱ्या संगमेश्वर मंदिर परिसरामध्ये नेण्यात आली. यावेळी पालखीची ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण गावांमध्ये ग्राम मिरवणूक करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर ‘नाथ साहेबांच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने दुमदुमला होता.
यावेळी संगमेश्वर मंदिर परिसरामध्ये गावचे पाटील मानकरी साहेबराव कामथे यांच्या हस्ते पारंपारिक सीमोल्लंघन करून आपट्याच्या पानांची पूजा केली. ग्रामस्थांच्या वतीने सोने म्हणून ते लुटण्यात आले. यावेळी ग्रामपुरोहीत अजितकाका खळदकर यांनी पौरोहित्य केले.