खळद, ता. १९ : एखतपूर (ता. पुरंदर) श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येथे ‘श्री संत तेल्या भुत्याच्या मानाच्या कावडीची उभारणी करण्यात आली. मानकरी शिवयोगी संत भुतोजी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात खळद, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तिभावाने सहभागी झाले होते.
कावडीच्या उभारणीनंतर ‘शंभू महादेवा’च्या जयघोषात आणि रंगांची उधळण करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याने यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
यानंतर पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी यजमान गावच्या वतीने तुषार झुरंगे, महादेव टिळेकर यांनी स्वागत केले तर कैलास कामथे, रवींद्र फुले, देविदास कामथे आदींनी शिखर शिंगणापूर यात्रेसाठी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकांचा आढावा व यात्रेमध्ये पाणी, अन्नदान, निवास, जनावरांसाठी चारा व इतर सुविधा याबाबत केलेल्या सर्व नियोजनाची माहिती भाविकांना दिली.
मानकरी नाना महाराज खळदकर यांनी भाविकांना आशीर्वाद दिले. ‘‘वाढत्या उन्हामुळे ही यात्रा भक्ती आणि शक्तीची कसोटी पाहणारी ठरेल, मात्र भगवान शंभू महादेव सर्वांना बळ देतील,’’ असा विश्वास व्यक्त करत त्यांनी यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
या वर्षी सोहळ्याच्या नियोजनाची जबाबदारी पंचक्रोशीतील खानवडी गावावर असून येथील सौरभ दत्तात्रेय होले यांच्या बैलगाडीला कावड नेण्याचा मान मिळाला आहे, याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
आता रामनवमीला प्रस्थान
या सोहळ्यानंतर आता भाविक पायी वारीच्या तयारीला लागले आहेत. रामनवमीच्या दिवशी ही कावड कऱ्हा नदीचे पवित्र जल घेऊन खळद येथून शिखर शिंगणापूरच्या दिशेने पायी प्रस्थान करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.