कळस, ता. २० ः ‘‘मंझिले उन्हींको मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नही होता, हौंसलोसें उडान होती है..!’’ याप्रमाणेच देशाचे मिसाईलमॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत देशाचे महान शास्त्रज्ञ बनले. आजचा बाल वैज्ञानिक उद्याचा मोठा शास्त्रज्ञ अथवा उद्योजक असू शकतो. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. बाबीर विद्यालयाच्या माध्यमातून एक संस्कारक्षम पिढी घडत असल्याचे प्रतिपादन सोनाई उद्योग समुहाचे प्रवीण माने यांनी केले.
रुई (ता. इंदापूर) येथे आयोजित ५३ व्या बाल वैज्ञानिक प्रदर्शनाची आज सांगता झाली. यामध्ये उल्लेखनीय प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माने यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, माऊली चवरे, अमरसिंह मारकड, अंकुश लावंड, आकाश कांबळे, शिक्षण विस्ताराधिकारी सुनिल मुंगळे, मुख्याध्यापक जे. एन. पाटील, विश्वजीत करे आदी उपस्थित होते.
धनाजी गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या प्रदर्शनात तालुक्यातील ६८ माध्यमिक शाळा, २ आश्रम शाळा, ३ प्राथमिक शाळा अशा ७३ शाळांतील विद्यार्थ्यांनी १५० प्रकल्प सादर केले.
विजेते विद्यार्थी, शाळा व प्रकल्प
विद्यार्थी गट (६ वी ते ८ वी) - संग्राम पवार (प्रथम क्रमांक - अग्नीशामक यंत्र - श्री बाबीर विद्यालय रुई), प्रतिक कुंभार (व्दितीय क्रमांक - बहुउद्देशीय छत्री - कर्मयोगी विद्यालय कुरवली), समर्थ सुतार (तृतीय क्रमांक - प्रदुषणविरहीत ट्रॅक्टर- नंदकिशोर विद्यालय सराफवाडी).
दिव्यांग विद्यार्थी गट (९ वी ते १२वी) - सिध्दार्थ सागर लोंढे (प्रथम क्रमांक - कार्बन प्युरीफिकेशन - श्री बाबीर विद्यालय रुई).
प्राथमिक शिक्षक गटातून जयश्री सरके, माध्यमिक शिक्षक गटातून वालचंदनगरच्या वर्धमान विद्यालयाच्या शिक्षिका अरुंधती अंबिके यांच्या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. तर, शिंदेवाडीच्या छत्रपती हायस्कूलचे शिक्षक संतोष देवकाते यांच्या पवन ऊर्जा प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला. प्रयोगशाळा परिचर गटातून गोखळी येथील गुरुकूल विद्यालयाचे समाधान हरणावळ यांच्या किटकनाशक वनस्पती प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. याशिवाय लहान व मोठ्या गटातील निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी शाळांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.