पुणे

इंदापुरातील वनक्षेत्र ठरतेय पर्यटनासाठी मैलाचा दगड

CD

शेती व शेती पूरक व्यवसाय, पाणीटंचाई आणि संघर्षशील जीवनासाठी ओळखला जाणारा इंदापूर तालुका सध्या बदलत्या काळात समृद्ध होत आहे. एकीकडे उजनी धरणाचे विस्तीर्ण पाणलोटक्षेत्र, त्यालगत बागायत शेतीचा पट्टा आणि बाजूला लागून असलेले मोठे वन क्षेत्र व त्यातील वन्यजीव हे नैसर्गिक वैभव पर्यटनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारे आहे.
- सचिन लोंढे, कळस

वनातील चिंकारा, लांडगा, कोल्हा, तरस, ससा, घोरपड, विविध प्रजातीचे साप, तितर, टिटवी, मोर, साळींदर यांसारखे अनेक प्राणी व पक्षी निरिक्षणाची संधी येथे उपलब्ध आहे. वन पर्यटन संकल्पनेच्या माध्यमातून तालुक्यातील वन व माळरान परिसराचा विकास केल्यास, स्थानिकांच्या रोजगाराच्या दृष्टीने येथे मोठ्या प्रमाणात काम करणे शक्य आहे. विशेष म्हणजे या माळरानात आढळणारी नैसर्गिक परिसंस्था आणि वन्यजीवांचे अस्तित्व हे या पर्यटनाला एक वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप देऊ शकते.

वन व वन्य जीव नैसर्गिक देणगी
इंदापूर तालुक्यात सुमारे सहा हजार १३६ हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये बहुतांश पट्टा माळरान आहे. माळरान म्हणजे कोरडी, नापिक आणि ओसाड जमीन अशी प्रतिमा अनेक वर्षे समाजमनात आहे. मात्र वास्तवात हे माळरान नैसर्गिक जैवविविधतेचे महत्त्वाचे केंद्र आहे. पावसाळ्यात हिरवळीने नटलेला गवताळ माळ आता रंग बदलून सोनेरी झाला आहे. येथे पावसाळ्यात फुलणारी रानफुले, उन्हाळ्यात तग धरुन राहणारी काटेरी झुडपे, एरवी स्वच्छ आकाश आणि विस्तीर्ण मोकळे क्षितिज हे दृश्य शहरी पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकते. त्यांना येथे आढळणाऱ्या विविध लहान-मोठ्या वन्यजीवांचे निरिक्षण करणे उघड्या डोळ्यांनी सहज शक्य आहे.

स्थलांतरित व स्थानिक पक्षी
उजनीचे पाणलोट क्षेत्र हिवाळ्यातील काही महिने खाद्यान्नाच्या शोधात आलेल्या स्थलांतरित पाणपक्ष्यांनी गजबजलेले असते. धरणात मुबलक पाणीसाठा असला की, गावागावांतील वन तलावांतील पाणथळ जागांवर या स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. स्थानिक बगळे व स्थलांतरित बदक वर्गीय पक्षांनी वनातील अनेक ठिकाणं फुलून गेलेली असतात. हीच जैवविविधता तालुक्यातील माळरानाला वन्यजीव निरीक्षणसाठी योग्य बनवते. याचा उपयोग करून घेतल्यास भविष्यात तालुक्यातील वनक्षेत्र मोठे वन पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते.

वन्यजीव पर्यटनातून नवी संधी
पर्यटक केवळ प्राणी संग्रहालय किंवा जंगल सफारीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. नैसर्गिक अधिवासात शांतपणे वन्यजीव पाहण्याची संधी अनेकांना आकर्षित करते. मग या पर्यटकांची पावले आपोआप तालुक्याच्या दिशेने वळण्याच्या दृष्टीने वनांचा विकास अपेक्षित आहे. पर्यटकांचा ओघ वाढविण्याच्या दृष्टिकोनातून येथे काही सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. यामध्ये पक्षीनिरीक्षण, चिंकारा दर्शन सफारी, इतर प्राणी पाहण्याची संधी, रात्री निसर्ग निवासात राहून वन्यजीवांचे आवाज ऐकण्याचा अनुभव, छायाचित्रण यांसारख्या काही पर्यटन संकल्पना विकसित करता येऊ शकतात.

शहरी पर्यटकांची बदलती आवड
सध्याच्या धकाधकीच्या काळात शहरातील पर्यटक गर्दी, गोंगाट आणि महागडे रिसॉर्ट्स टाळून शांत, नैसर्गिक आणि अनुभवात्मक पर्यटनाकडे वळत आहेत. अशा पर्यटकांना इंदापुरातील वन सफारी खुणावत आहे. निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक, छायाचित्रकार, विद्यार्थी व संशोधक, कौटुंबिक ‘निसर्ग सहल’ यांसाठी इंदापुरातील वन पर्यटन बेस्ट ऑप्शन आहे. तालुक्याची भौगोलिक रचना वनपर्यटनासाठी अनुकूल आहे.
पुणे, बारामती, सोलापूर, सातारा, अहिल्यानगर यांसारख्या शहरांपासून हे ठिकाण जवळ असल्याने वीकएंड पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. सध्या देशभरातील पर्यटक व पक्षी निरिक्षक तालुक्यातील उजनीच्या पट्ट्यात कायम हजेरी लावत असतात. याच पर्यटकांना वन पर्यटनाकडे वळविल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. स्थानिक निसर्ग मार्गदर्शक, वन्यजीव निरीक्षण सहाय्यक, तंबू व निवास व्यवस्थापक, छायाचित्रण मार्गदर्शक,
खाद्यपदार्थ विक्रीतून युवकांना गावातच रोजगार मिळून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊ शकते. याशिवाय वन पर्यटनात स्थानिक महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. स्थानिक पदार्थ,

पारंपरिक पाककृती, हस्तकला, शेतीपूरक उत्पादने यामधून महिलांनाही उत्पन्नाची संधी मिळू शकते. एकंदरीत वन पर्यटन हे महिला सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरू शकेल.

वन पर्यटन म्हणजे काय?
वन व वनातील माळरान पर्यटन म्हणजे निसर्गाशी सुसंगत पर्यटन होय. नेचर ट्रेल्स (नैसर्गिक पायवाटा) व मार्गदर्शित फेरफटका, वन्यजीव निरीक्षणासाठी ठराविक मार्ग, तंबू पर्यटनासाठी वेगळं ठिकाणं, निसर्ग अभ्यास शिबिरांसाठी सोय, रात्री आकाश निरीक्षण (स्टार गेजिंग) व्यवस्था व ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्याची सुविधा उपलब्ध करणे. याशिवाय येथील वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन आखणे आवश्यक आहे. पर्यटनादरम्यान प्लॅस्टिकमुक्त पर्यटनावर भर देणे, पर्यटकांची संख्या मर्यादित ठेवणे, ठराविक मार्गांशिवाय प्रवेश नाकारणे आणि वन्यजीवांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतल्यास येथील पर्यटन केंद्र संवर्धन-केंद्रित मॉडेल ठरू शकते. यासाठी शासनाच्या वनविभागाने पुढाकार घेऊन इंदापुरातील माळरान वनपर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे.

वन्यजीवांचा दैवी खजिना
लोकप्रतिनिधींचा पुढाकार, योग्य दृष्टिकोन, स्थानिक सहभाग आणि वन्यजीव संवर्धनाची जोड दिल्यास इंदापूर महाराष्ट्रातील एक वेगळे ‘निसर्ग व वन्यजीव पर्यटन केंद्र’ बनू शकते. माळरान हे केवळ ओसाड भूभाग नाही, तर निसर्ग व वन्यजीवांचा दैवी खजिना असल्याच्या दृष्टीने विकसित करणे गरजेचे आहे.

पर्यटन नकाशावर इंदापूर तालुका उजळेल
वन व वन्यजीव पर्यटनाची सुरवात केल्यास येथील परिसर अधिक समृद्ध होईल. निसर्गाचा सन्मान राखत, स्थानिकांना केंद्रस्थानी ठेवून हा विकास साधला, तर इंदापूर तालुका पर्यटन नकाशावर ठळकपणे उजळून निघेल.

03213, 03215

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT