पळसदेव, ता. १५ : उजनी धरणाने (यशवंत सागर) प्रदूषणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या धरणातील जलसाठ्यावर प्रदूषणाची कुऱ्हाड कोसळली आहे. धरणातील सध्याची पाण्याची अवस्था पाहता, कधीकाळी तळ दाखविणारे चकचकीत भीमेचे पाणी आता गटारगंगा सदृश झाल्याची भावना स्थानिक व्यक्त करत आहेत. सध्या हिरव्या गर्द रंगाच्या दुर्गंधीयुक्त थराने उजनीचे पाणी व्यापून गेले आहे. यामुळे प्रदूषणामुळे उजनीचा श्वास गुदमरला आहे.
गटारातील पाण्यासारखी दुर्गंधी
उजनीतील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टिकोनातून राजकर्त्यांनी तत्परता दाखविणे गरजेचे आहे. उजनी धरण भरल्यानंतर दरवर्षी पावसाळ्यात या धरणात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून रसायनमिश्रीत पाणी, शहराने वापरलेले व प्रक्रिया न केलेले सांडपाणी सर्रास भीमेच्या पात्रात सोडून देण्यात येते. हेच पाणी पुढे उजनीत येऊन साचल्याने त्याला गटाराच्या पाण्याचे रूप येते. याचा येथील स्थानिकांच्या शेतीसह मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. पावसाळ्याची संधी साधून थेट उजनीत रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्या उद्योगांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
शेतीच्या उत्पादनात घट
सध्या उजनीच्या पाण्याचा शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. उजनीच्या पाण्यातील शेतीला पूरक जिवाणू नष्ट होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. शिवाय जमिनीचा पोत खराब होत असून, रासायनिक खते औषधांचा वापरही निष्फळ ठरत असल्याचे बोलले जात आहे. दूषित पाण्यामुळे पिकांची नासाडी करणाऱ्या कीटकांची संख्या येथे लक्षणीय वाढली आहे.
उसाच्या एकरी १२ टन उत्पादनात घट
उजनीच्या प्रदूषित पाण्यामुळे उसाचे एकरी हा १० ते १२ टन उत्पादन घटले आहे. याशिवाय तरकारी पिकांवर कोळीसदृश किटकांकडून जाळी तयार केली जात असून, याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. जमिनींचा रंग बदलला आहे. ठिबक सिंचन यंत्रणा तर येथे कुचकामी ठरत आहे. वारंवार फिल्टर जाम होत असल्याने, उजनी लगतच्या शेतकऱ्यांकडून ठिबकचा वापर करणे टाळले जात आहे. पिकांचा उत्पादन खर्च वाढत असून, उत्पादन घटले आहे.
मानव व पशुधनावर विपरीत परिणाम
सध्या उजनीलगतच्या ग्रामपंचायतींनी जलशुद्धीकरण यंत्रणा वापरण्यास सुरुवात केल्याने, पोटाचे व त्वचेचे विकार असणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वीची परिस्थिती विचारात घेतल्यास पंचवीस लोकांमध्ये दोन रुग्ण या व्याधींनी त्रस्त असल्याचे आढळून येत होते. परंतु सध्या त्वचेच्या विकारांना मच्छिमारांना कायम सामोरे जावे लागत आहे. उजनीलगतच्या विहिरींमध्ये पाण्याचे रासायनिक घटक उतरलेले आहेत. याचाही परिणाम आरोग्यावर होत असल्याचे उजनीच्या पट्ट्यातील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पशुधनाचे आर्युमान कमी झाल्याने व त्यांची खरेदी-विक्री केली जात असल्याने दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास करण्यात अडचणी येत असल्याचे काही पशुचिकित्सकांनी सांगितले.
देशी मासे संपुष्टात
प्रदूषित पाण्यामुळे उजनीत ६० ते ७० प्रजातीचे देशी माशाची पैदास संपुष्टात आली आहे. याशिवाय विकसित प्रजातीचे मासे मिळण्याचे प्रमाण कमालीचे घटल्याचे मच्छीमार सांगत आहेत.
प्रजातीचे अस्तित्व संपल्यात जमा
नैसर्गिक प्रजनन होणाऱ्या कोवरा, शिवडा, शेंगळ, सुंबर, वळंज, सालट, फेक, आंबळी, गुगळी, शिलन, आहेर यासारख्या देशी प्रजातीचे अस्तित्व संपल्यात जमा आहे. तर रोहू, कटला, मृगल, गवत्या, सफरनेस, सिल्व्हर यांसारख्या विकसित प्रजातीचे मासे काही प्रमाणात मिळत आहेत.
शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) शास्त्रज्ञांनी नुकतीच उजनीच्या पाण्याची पाहणी करून काही नमुने घेतले आहेत. याबाबत बोलताना बीएनएचएसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेश काटवटे म्हणाले की, सध्या पाण्याच्या गुणवत्तेची स्थिती अत्यंत खराब आहे. यामुळे गंभीर आरोग्यविषयक धोके निर्माण झाले आहेत. यावर राष्ट्रीय सुरक्षेइतक्या महत्त्वाच्या पातळीवर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.
या उपाययोजनांची गरज
१. भीमा नदीच्या वरील टप्प्यातील जलसंकलन क्षेत्रातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शुद्धीकरण (ईटीपी) प्रकल्प उभारणे
२. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करण्याबरोबर घरगुती सांडपाणी थेट नदीत सोडण्यावर कडक नियंत्रण गरजेचा
३. उजनी धरण व भीमा नदीलगतची सर्व गावे आणि जवळचे ओढे-नाले जैविक सांडपाणी शुद्धीकरण युनिट्सने सुसज्ज करावे
४. थेट नदीपात्र व उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील मोठ्या गावांचे असलेले कचरा डेपो तत्काळ हलविणे
भिगवण येथील कचरा डेपो थेट उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. परिणामी कचऱ्यातून विषारी द्रव उजनीच्या पाण्यात मिसळण्याचा धोका नाकारता येत नाही. यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविल्या नाहीत, तर पाण्याची गुणवत्ता व सार्वजनिक आरोग्याचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. या गंभीर समस्यांवर उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त सीएसआर निधी खर्च करण्याची गरज आहे.
- डॉ. उन्मेश काटवटे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, बीएनएचएस
03306, 03305
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.