पळसदेव, ता. १२ : पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या अनेक ढाब्यांवर घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा बेधडक सर्रास वापर सुरू आहे. दौंड तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका ढाब्यावर सिलिंडरचा स्फोट होऊन निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतरही प्रशासनाकडून ढाब्यांवर होणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडर वापराकडे काणाडोळा केला जात आहे. प्रशासनाचा हा हलगर्जीपणा मोठ्या दुर्घटनेचे कारण बनण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील ग्राहकांना ९ गॅस वितरण एजन्सीच्या माध्यमातून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र सर्वसामान्य नागरिकांना घरगुती सिलिंडर मिळवण्यासाठी मोबाईलवर आगाऊ नोंदणी करावी लागते. यानंतर संबंधित गॅस एजन्सीकडून डिलिव्हरी चार्जेससहीत रक्कम घेऊन संबंधित ग्राहकाला सिलिंडर पोचविला जातो. ग्रामीण भागात ही वस्तुस्थिती अधिक गंभीर आहे. एकीकडे डिलिव्हरी चार्जेस घेतले जात असले, तरी दुसरीकडे मात्र टाकी घरापर्यंत पोचवली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशा मजूरांना उज्ज्वलाची टाकी घेण्यासाठी कामाचा खाडा करून गाडीची वाट बघत बसावे लागते. परंतु हेच गॅस एजन्सीधारक नियम धाब्यावर बसवून हॉटेल, ढाबा चालकांच्या दारापर्यंत घरगुती सिलिंडर पोहोचवत आहेत. अनेकांकडून या टाक्यांचा साठा केला जात असल्याचे बोलले जात आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेले निळे सिलिंडर वापरणे बंधनकारक असताना, स्वस्त दरातील घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर सुरु आहे.
दौंडमधील दुर्घटनेनंतर इंदापूर प्रशासनाने तातडीने महामार्गावरील ढाब्यांची तपासणी करून कडक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, इंदापूर तालुक्यात अद्याप एकही मोठी कारवाई झालेली नाही. गॅस एजन्सी आणि हॉटेलचालकांच्या या जीवघेण्या ‘लिंक’कडे प्रशासनाचे अधिकारी का डोळेझाक करत आहेत? दौंडच्या घटनेची पुनरावृत्ती इंदापूरमध्ये होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतापजनक प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुरवठा विभागाने या अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करून घरगुती सिलिंडरचा काळाबाजार रोखावा अशी मागणी जोर धरत आहे.
आम्ही दौंड येथील दुर्घटनेनंतर दोन्ही तालुक्यातील सर्व ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेल चालकांना घरगुती गॅस सिलिंडरचा वापर न करण्याबाबत तलाठ्यांच्या माध्यमातून नोटीस दिलेली आहे. यानंतर निवडणूक कार्यक्रमात व्यस्त असल्याने पुढील कार्यवाही केली नाही. मात्र सध्या प्रत्येक हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटची तपासणी करून अवैध घरगुती सिलिंडर वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- एस. एम. गड्डमवार, इंदापूर, दौंड तालुका पुरवठा निरिक्षण अधिकारी,
हॉटेलचालकांकडून घरगुती टाक्यांचा वापर
घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या वजनात व किमतीत बदल आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या टाकीतील एलपीजी गॅस घरगुती गॅसच्या तुलनेत महाग बसतो. केवळ टाकीचा रंग बदलला की गॅसची किंमत वेगळी होते. प्रतिकिलोच्या हिशोबाने ३० ते ३५ रुपये जास्तीचा दर व्यावसायिक सिलिंडरमधील गॅससाठी मोजावा लागतो. परिणामी एका टाकीमागे ५०० ते ६०० रुपये जास्तीचे मोजावे लागतात. यामुळे हॉटेलचालक घरगुती टाक्यांचा वापर करतात. सध्या व्यवसायात अनेक अडचणी आणि कमालीची स्पर्धा वाढलेली आहे. यामुळे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब होत असल्याचे हॉटेल चालकाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.