पळसदेव, ता. १३ : उजनी धरणाची पाणीपातळी वेगाने कमी झाल्यामुळे मच्छिमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक ३० टक्क्यांनी वाढली असून, रोहू, कटला व चिलापी माशांच्या उपलब्धतेमुळे मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी माहिती भिगवण येथील अंबिका मच्छि व्यावसायिक सहकारी संस्थेचे व्यवस्थापक संदीप मल्लाव यांनी दिली.
यंदा परतीच्या पावसाने नोव्हेंबरपर्यंत मुक्काम लांबविल्याने उजनी धरण १०० टक्के भरले होते. याशिवाय सोलापूरला समांतर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने नदीतून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी २६ जानेवारीपर्यंत उजनी धरणात ११७ टीएमसी पाणी (१०० टक्के) शिल्लक होते. यानंतर कालवा, बोगदा व पाणी योजनांना आवर्तन सुरू करण्यात आले. यानंतर ४ फेब्रुवारीला नदीतून पिण्याच्या पाणी योजनांसाठी पाणी सोडण्यात आले. दहा दिवसांत उजनीतील पाणी पातळी २० टक्क्यांनी (सुमारे १० टीएमसी पाणी) कमी झाली. पाणी जास्त असताना मासे खोलवर जात असल्याने मच्छिमारांच्या जाळ्यात अपेक्षित मासे येत नव्हते. मात्र, आता पाणी कमी झाल्याने माशांचा वावर मर्यादित क्षेत्रांत वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून मासळी बाजारात माशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोट्यवधींचे अर्थकारण
सध्या उजनीतील माशांच्या जीवावर भिगवण, इंदापूर, जेऊर, टेंभूर्णी येथील मासळी बाजाराचे अर्थकारण चालते. सुमारे ४५०० मच्छिमार कुटुंबांसह दीड लाख लोकांचा रोजगार उजनीतील मासेमारी व्यवसायाशी जोडलेला आहे. सध्या उजनीतून दररोज ४० ते ५० टन मासे मिळत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या पुढाकारातून उजनीत गतवर्षी दोन कोटी मत्स्यबीज सोडण्यात आले होते. परिणामी याचा मोठा फायदा मच्छिमारांना सध्या होत आहे.
रोहू, कटला यांसारख्या माशांची नांदी
सध्या उजनीतून रोहू, कटला, चिलापी यांसारखे मासे मोठ्या प्रमाणात मच्छिमारांच्या जाळ्यात पडत आहेत. चिलापीच्या तुलनेत रोहू व कटला माशांचा दर जास्तीचा आहे. मार्केटमध्ये कटला मासा २०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. तर एक किलो वजनापर्यंतच्या रोहू माशांचे दर ५० ते ६० रुपये आहे. याबरोबर चिलापीचेही दर ५० ते ७० रुपयांपर्यंत आहेत. स्थानिक मच्छिमारांना दररोज किमान ४० ते ५० किलो व कमाल १०० ते १५० किलोपर्यंत मासे मिळत आहेत.
उजनीतून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले रोहू, कटला यांसारखे कार्प जातीचे मासे सध्या मुबलक प्रमाणात मिळत आहेत. याचा मच्छिमारांना फायदा होत आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यंदाही १ कोटी २२ लाख मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काही वर्षे मच्छिमारांना ‘अच्छे दिन’ राहणार आहेत.
- अनिल नगरे, अध्यक्ष, इंदापूर तालुका मच्छिमार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.