कानगाव, ता. ७ : दौंड तालुक्यातील गार, नानवीज व सोनवडी या गावांसाठी मंजूर केलेली प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सात वर्षांनंतरही सुरू झाली नाही. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे योजनेचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास गार नानविज सोनवडी प्रादेशिक ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेच्या शिखर समितीसह रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सर्फराज शेख यांनी १३ मार्चपासून मुंबई येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
योजना १३ कोटी ७४ लाख रुपयांची असून त्यामध्ये ७४ लाख रुपयांची वाढीव तरतूद केली आहे. तसेच ‘रेट्रो फिटिंग’साठी शासनाने आणखी एक कोटी ११ लाख रुपये मंजूर केले आहेत. एवढ्या मोठ्या निधीनंतरही योजना कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नाची दखल थेट राज्याच्या सभागृहात घेण्यात आली. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आमदार सदाभाऊ खोत यांनी सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे हा मुद्दा उपस्थित केला. नळ पाणीपुरवठा योजना सन २०१९ मध्ये मंजूर झाली होती. वाढीव कालावधी धरूनही तीन वर्षांत ही योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सात वर्षे उलटूनही योजना सुरू झालेली नाही. ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गंभीर त्रुटींमुळे काम रखडल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे तीनही गावांतील नागरिकांना अद्याप पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही.
नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र, योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नाही. जलवाहिनीच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सर्फराज शेख यांनी केली आहे.
नळ जोड देण्याचे कामही प्रलंबित
योजनेअंतर्गत सुमारे ६२ किलोमीटरची जलवाहिनी टाकली आहे. मात्र, त्यापैकी सुमारे ५० किलोमीटरची जलवाहिनीचे अद्याप हायड्रोलिक टेस्टिंग झालेले नाही. तसेच तीनही गावांमध्ये नळ जोड देण्याचे कामही प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात शासनाकडून गावांतर्गत सिमेंट व पक्के रस्ते बांधण्यात आले. त्यामुळे गळती अथवा तांत्रिक बिघाड आढळल्यास दुरुस्ती करणे कठीण होण्याची शक्यता आहे.
00379
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.