केसनंद, ता. ३० : पूर्व हवेलीत एका महिलेवर बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर ऍक्टिव्ह झालेल्या वन विभागाने पूर्व हवेलीत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांचा सर्वाधिक वावर लक्षात घेऊन विविध ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावले होते. अखेर मंगळवारी (ता. ३०) सकाळी अष्टापूर येथे खोलशेत वस्तीत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, पूर्व हवेलीत वढू, फुलगाव, पेरणे, डोंगरगाव, पिंपरी सांडससह अनेक ठिकाणी बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारीमुळे पूर्व हवेलीतील ग्रामस्थांच्या मनात भीतीची छाया अजूनही कायम आहे.
पूर्व हवेलीत अष्टापूर येथे मंगळवारी (ता. ९) अंजना वाल्मीक कोतवाल या शेतकरी महिला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. अष्टापूर तसेच वढू, डोंगरगावसह पेरणे हद्दीत विजयस्तंभ परिसरातही एकापेक्षा अधिक बिबट्यांचा वावरायची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. दरम्यान, जखमी महिलेला शासकीय मदत तसेच उपचार मिळवून देण्यासाठी व आवश्यक तेथे पिंजरे लावण्यासाठी आमदार माऊली कटके व श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर ऍक्टिव्ह झालेल्या वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बिबट्याचा सर्वाधिक वावर लक्षात घेऊन पूर्व हवेलीत एकूण आठ ठिकाणी तर प्राधान्याने अष्टापूर परिसरात चार ठिकाणी पिंजरे व ट्रॅकिंग कॅमेरे लावले होते. तसेच थर्मल ड्रोनद्वारेही मागोवा घेतला जात होता. अखेर मंगळवारी सकाळी अष्टापूर येथे खोलशेत वस्तीत सुरेश राजाराम कोतवाल यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसत असल्याने पूर्व हवेलीत अनेक गावातील ग्रामस्थांच्या मनात भीतीची छाया अजूनही कायम आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली, लोणीकाळभोरचे वनपरिमंडल अधिकारी प्रमोद रासकर, अष्टापूरच्या वनरक्षक कोमल सकपाळ, वनसेवक बापू बाजारे तसेच ग्रामस्थ, तरुण वर्गासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
5283