कोरेगाव भीमा, ता. ३० : येत्या एक जानेवारीला शौर्य दिन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दलासह शासनाचे विविध विभागही सज्ज झाले असून विजयस्तंभस्थळी फुलांच्या सजावटीसह तयारीला वेग आला आहे. मंगळवार (ता. ३०) पासूनच पोलिस बंदोबस्त तसेच सुविधांसाठी शासकीय यंत्रणेच्या वाहनांची गर्दी झाल्याने या परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले असून अहिल्यानगर महामार्गावर पेरणे विजयस्तंभ परिसरात दिवसभर वाहतूक कोंडीही दिसून आली.
पेरणेफाटा येथे विजयस्तंभस्थळी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवान कार्यवाही सुरू असून यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने वाढीव प्रमाणात जय्यत तयारी केली आहे. अभिवादनासाठी शिरूर तसेच पुण्याकडून येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी पार्किंग, बस वाहतूक, शौचालय, आराम कक्ष, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सहायता आदी अनेक सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या आहेत. तर महिला अनुयायांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी व आराम कक्ष, अधिक सुविधायुक्त हिरकणी कक्षासह स्वतंत्र नियोजन केले असून महिलांसाठी स्वतंत्र बस व अभिवादन रांगेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
अभिवादन दिन कार्यक्रमासाठी शहर पोलिस दलाच्या वतीने आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, पोलीस अंमलदार, होमगार्ड, एसआरपीएफ कंपनी, क्यूआरटी टिम, आरसीपी टीम, बीडीडीएस टिम असा सुमारे साडेसात हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
शिरूर हद्दीतील फौजफाटा
पोलिस अधीक्षक :१
अतिरिक्त अधीक्षक दर्जाचे अधिकारी : ७
उपअधीक्षक : २५
निरीक्षक : ६९
साहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक :२६९
पोलिस अंमलदार : ३०००
एसआरपीएफ कंपनी : १२
होममगार्ड : १५००
बंदोबस्ताचा कालावधी : ३१ डिसेंबर ते १ जानेवारी रात्री उशिरापर्यंत
खबरदारीचे उपाय
महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, सर्व्हिलन्स व्हॅन, डी.एफ.एम.डी, एच.एच.एम.डी,आदी अत्याधुनिक साधनेही सज्ज
विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट :
यंदा विजयस्तंभावर नैसर्गिक व कृत्रिम अशा सुमारे दोन लाख फुलांच्या सजावटीत पंचशीलाच्या चौकटीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र, तसेच भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह व त्याचसोबत न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व असा सांविधानिक मूल्यांचा संगम असलेली सजावट अंतिम टप्प्यात आली आहे.
पार्किंगची २२ ठिकाणी प्रशस्त सुविधा
शिरूर व हवेली हद्दीत विविध टप्प्यावर सुमारे २२ ठिकाणी प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे तसेच अंतर्गत वाहतुकीसाठी बसेसचीही सुविधाही केली असून विजयस्तंभ परिसरात; मात्र पूर्णपणे वाहनबंदी करण्यात आली आहे.
पेरणे- कोरेगाव ग्रामपंचायत व प्रशासनाचा स्वागत कक्ष
दरवर्षीप्रमाणे पेरणे व कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीसह प्रशासनाचा स्वागत व मदत कक्ष असणार आहे. यात शासकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी स्वागत व मदतीसाठी सज्ज राहणार आहेत. तर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांचे स्थानिकांकडून गुलाबपुष्पानेही स्वागत होणार असून उत्साह व सुरक्षित वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे.
विजयस्तंभ परिसरात येण्या-जाण्याचे प्रशस्त नियोजन
अभिवादनासाठी विजयस्तंभाकडे येणाऱ्या अनुयायांसाठी यावर्षी येण्याचे तसेच बाहेर पडण्याचेही मार्ग वाढवण्यात आल्याने प्रशासनाने गर्दीचे योग्य नियोजन केले आहे. तसेच याबाबत प्रशासनाकडूनही ध्वनिक्षेपकावरून सातत्याने सूचना देण्यात येणार आहेत.
पुरेशा आरोग्य सुविधा
आरोग्य कक्ष, फिरते बाईक आरोग्य पथक, रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारीही नियुक्त केले असून जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह पुरेशा प्रमाणात खाटाही प्रशासनाकडून आरक्षित करण्यात आल्या आहे.
मुबलक पिण्याचे पाणी
स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता २०० पेक्षाही अधिक पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. टँकरला नळ तोट्यासह ग्लास व मदतीला कर्मचाऱ्यांचीही नियुक्तीही करण्यात आली आहे.
हिरकणी कक्ष :
स्तनदा माता व महिलांसाठी हिरकणी कक्षासह बालकांच्या मनोरंजना करिता खेळणी साहित्य व खाऊ पदार्थ तसेच मदतीसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.
वाढीव शौचालय सुविधा
अनुयायी तसेच बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांकरिता महिला व पुरुषांसाठी एकूण २५०० पेक्षा जास्त शौचालये, पाण्याचे टँकर व सक्शन मशीन तसेच जेटींग मशीनही उपलब्ध आहेत.
सुविधा व स्वच्छतेसाठी मोठी यंत्रणा
विजयस्तंभ परिसर तसेच वाहनतळ व आरोग्यबुथ परिसरात स्वच्छते करिता सफाई कामगार नियुक्त केले असून निर्जंतुकीकरण तसेच कचरा उचलणे या करिता कचरा वाहतूक घंटागाड्याही उपलब्ध असणार आहेत. तसेच याच यंत्रणेकडून २ जानेवारीलाही या परिसरात स्वच्छता केली जाणार आहे. अनुयायांसाठी उपलब्ध सुविधांचे संनियंत्रण करून सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ६५० पेक्षाही अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिशादर्शक फलक
अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयांयाना विजयस्तंभ परिसरात वाहनतळासह उपलब्ध सोयी सुविधा कळाव्यात याकरिता पुणे व नगर बाजूकडे जागोजागी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत.
ग्रंथ प्रदर्शन
विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्या वतीने पुस्तकांचे स्टॉल उभारले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तकांचे सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.
सोशल मीडियांवर बारकाइने नजर
सोशल मीडियावर जातीय भावना दुखावणे, प्रक्षोभक वक्तव्य , खोट्या अफवा, चुकीच्या पोस्ट पसरवणाऱ्या व्यक्तींवर पोलीस सायबर सेलची बारकाईने नजर असून दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मद्यविक्री दोन दिवस बंद
लोणीकंद व शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मद्य विक्री ३१ तारखेला सायंकाळपासून एक जानेवारीला दिवसभर बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वाहतुकीत बदल
३१ डिसेंबरच्या रात्रीपासून एक जानेवारीला दिवसभर अहिल्यानगर मार्गावर पुणे ते शिक्रापूर तसेच शिक्रापूर ते चाकण या परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असून पुणे तसेच अहिल्यानगर या दोन्ही बाजूने विजयस्तंभाकडे येणारी वाहतूक चक्राकार पद्धतीने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत.