केडगाव, ता. १० : मुळशी तालुक्यातील जमीनीच्या खरेदीखताचा दस्त केडगाव (ता. दौंड) येथे नोंदविताना दिड कोटी रूपयांचा मुद्रांक शुल्क बुडवणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुणे येथील विधान भवनासमोर सोमवारपासून (ता. ९) उपोषण सुरू झाले आहे.
हा दस्त २०२५ रोजी नोंदविण्यात आला आहे. शुल्क बुडवून सरकारचे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यावर दौंड येथील वकील श्रीनाथ वेताळ यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे वरिष्ठांकडे तक्रारीचा अर्ज देऊन वेताळ कालपासून उपोषणाला बसले आहेत.
वेताळ यांनी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मुकाईवाडी (ता. मुळशी) येथील जमीनीचा दस्त क्रमांक ४८६१/२०२५ केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात २५ आॅगस्ट २०२५ रोजी नोंदवला गेला आहे. या दस्त नोंदणीसाठी मर्जीतील अधिकाऱ्याची एका दिवसासाठी केडगाव येथे नेमणूक करण्यात आली. कारण, या दस्ताचे मुद्रांक शुल्क होते दोन कोटी १८ लाख रूपये, मात्र प्रत्यक्षात ६८ लाख ९५ हजार रुपये भरले. दस्त नोंदणी झाल्यानंतर प्रभारी अधिकाऱ्याची पुन्हा बदली झाली. या व्यवहाराची चौकशी व्हावी.
हा दस्त कोणाला माहिती होऊ नये म्हणून हा दस्त अनेक दिवस स्कॅन करून अपलोड केलेला नव्हता. मर्जीतील अधिकाऱ्याची पुन्हा नेमणूक करून सध्या हा दस्त अपलोड झालेला आहे. या व्यवहारात मोठी देवाणघेवाण झाल्याची तक्रार आहे. सुनील जोशी हे दुय्यम निबंधक असताना असे अनेक प्रकारचे दस्त बेकायदेशीरपणे व अत्यल्प मुद्रांक शुल्कावर नोंदविले गेले आहेत. त्यांचे वरिष्ठ त्यांना पाठिशी घालत आहे. संशयास्पद असणाऱ्या दस्तांची चौकशी झाली पाहिजे. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. दहा गुंठेचे आतील जमीनींचे तुकडे करून दस्त नोंदविले आहेत, असेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, केडगावचे तत्कालीन दुय्यम निबंधक सुनील जोशी यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.