कोळवण, ता. ३० : श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे व अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट (PDEA) यांच्या वतीने शनिवार (ता. २७) व रविवारी (ता. २८) तिकोना गडावर दुर्गसंवर्धन मोहीम व अभ्यास शिबिर पार पडले. इतिहास, पर्यावरण आणि शिवदुर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
शनिवारी सायंकाळी गड पायथ्यावरील तिकोना हॉलिडे होम येथे सर्वांचे एकत्रीकरण झाले. रोपवेच्या साहाय्याने स्वच्छतागृह, पाणी एटीएम व अन्य आवश्यक साहित्य गडावर पोहोचविण्याचे नियोजनबद्ध काम केले. त्यानंतर खेळ, संवाद व भोजन झाले.
त्यानंतर ‘मुळशीचा ऐतिहासिक वारसा” या विषयावर दुर्ग अभ्यासक आकाश मारणे यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी पहाटे जागरणानंतर गड परिसरात जैवविविधता अभ्यास सत्र झाले. यात प्रा. ज्ञानेश्वर महाजन यांनी मार्गदर्शन केले. गट रचना करून ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोचत सहभागी दुर्गसेवकांनी दिवसभर श्रमसाधना केली.
या श्रमदानामध्ये गडावरील प्लास्टिक कचरा संकलन, परिसर स्वच्छता तसेच पर्यावरण संवर्धनाची विविध कामे केली. वणव्यात झाडांना धोका निर्माण होऊ नये म्हणून झाडांच्या रोपांच्या आसपासचे गवत काढले. तसेच झाडांना आळी करून पाणी देण्यात आले. याचबरोबर गडावर आवश्यक ठिकाणी सूचना फलक, माहिती फलक व दिशादर्शक फलक बसविले. मंदिरावरील शेड, खांब व इतर लोखंडी वस्तू जीर्ण होऊ नयेत म्हणून त्यावर गंजरोधक रंग लावण्यात आला. पायऱ्या स्वच्छ केल्या, पायवाटांवरील सरकलेले दगड नीट बसविले तसेच गड परिसरातील गवत काढले. पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे वॉटर एटीएम बसविले असून पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचे काम केले आहे. या दोन्ही यंत्रणांचे जोडणीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. रामनदी परिसराची स्वच्छता केली. यावेळी शक्य तेवढे साहित्य डोक्यावर वाहून नेण्यात आले, तर अवजड साहित्य गडावर नेण्यासाठी रोपवेचा वापर केला. श्रमदानानंतर गडावरच भोजन व्यवस्थेची सोय केली.
त्यानंतर चर्चा सत्रात दुर्गसेवकांचे अनुभव कथन झाले. पंडित अतिवाडकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती व आगामी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. समारोप सत्रात डॉ. संदीप महिंद यांनी श्री शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिला. प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मोहिमेत सशक्त भारत, श्री शिवसमर्थ बचत गट, समर्पण अभ्यासिका, तिकोना ग्रामस्थ, मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, सह्याद्री आणि मी मावळ, समर्पण अभ्यासिका, डोनेट ऍड सोसायटी, रोहन बिल्डर्स आदी संस्थांचा विशेष सहभाग लाभला. दुर्ग संवर्धन, इतिहास जतन व सामाजिक बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण ठरलेली ही मोहीम सर्व सहभागींच्या निःस्वार्थ श्रमामुळे यशस्वी ठरली.