वाडवडिलांनी शेती कसली व ती सांभाळली. आपणही त्यांची परंपरा सांभाळायची. या भावनेतून मुळशी तालुक्यातील बळिराजा काळ्या आईशी एकनिष्ठ राहून, आधुनिक पद्धतीने तिची सेवा करीत आहे. काळानुसार सेंद्रिय व विषमुक्त पिकांचे उत्पादन घेण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. येथील स्वच्छ हवा, शुद्ध पाणी व लाल, तांबडी, काळी माती यांमध्ये घेतलेल्या शेती पिकांना वेगळीच चव व उच्च दर्जा प्राप्त झाला आहे.
- पांडुरंग साठे, कोळवण
---------------------------
शेती व शेतीपूरक व्यवसायाचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा मोठा आहे. मुळशी तालुक्यात शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येचा आलेख वाढत आहे. तालुक्यात नव्वदच्या दशकात पूर्व भागातील माण हिंजवडीत आयटी पार्कसाठी जमीन अधिग्रहण झाले. त्याबदल्यात शेतकऱ्यांच्या खिशात अचानक कोट्यवधी रुपयांचा पैसा खुळखुळू लागला. एकदम हातात इतके पैसे आल्याने तो खर्च कसा करावा, याची आर्थिक साक्षरता नव्हती. मात्र, नव्या पिढीमध्ये बऱ्याच प्रमाणात आर्थिक समज आल्याने परिस्थितीत सुधारणा झाली आणि यातून शेतीपूरक व्यवसाय सुरू झाले. यातून तरुण विकासपर्वाकडे मार्गस्थ झाला. भाताबरोबर सोयाबीन, नाचणी, वरई, भुईमूग लागवड होते. भातासाठी तालुक्यात सुमारे ७५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. तालुक्यात तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी पौड, पिरंगुट, माले कृषी सहायक, असे मिळून ३६ अधिकारी सर्व तालुक्याचा कृषिविषयक कारभार पाहतात.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून सन २०२५-२६ मध्ये तीन लाभार्थींना प्रत्यक्ष लाभाची सहा लाख रुपये रक्कम प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे वितरित केली गेली आहे.
कृषी यांत्रिकीकरणात तालुका अव्वल
तालुका कृषी विभाग राज्य सरकारच्या विविध योजना अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे. यामध्ये मागील दोन वर्षात पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका हा कृषी यांत्रिकीकरणात अव्वल राहिला. सुमारे दोन कोटी ६३ लाखांची शेती औजारे महाडीबीटी पोर्टलवरून वितरित केली गेली. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॕक्टर चलीत औजारे पेरणी यंत्र हार्वेस्टर, पॉवर वीडर, ठिबक, तुषार सिंचन यांचा समावेश.
९० टक्के क्षेत्रावर इंद्रायणी भात लागवड
मुळशीत ९० टक्के क्षेत्रावर प्रामुख्याने इंद्रायणी या भाताच्या वाणाची लागवड केली जाते. इंद्रायणीस हेक्टरी ४४ क्विंटल उत्पादन निघते. भातासाठी ७५०० हेक्टर क्षेत्रावर ३३००० टन भात उत्पादन होते. संपूर्ण तालुक्यात यातून तांदळास एका किलो मागे सरासरी ५५ टक्के उतारा मिळल्यास भरघोस उत्पादन होते. सोयाबीन लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असून ४० हेक्टर वर मर्यादित असणारी सोयाबीन लागवड आता ४५० हेक्टरपर्यंत गेली आहे.
उसाचे ७१,४०० टन उत्पादन
मुळशीत सरासरी ७१ हजार ४०० टन ऊस उत्पादन होत असून, कासारसाई येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना देखील कार्यरत आहे. तालुक्यात ऊस लागवड १०५० हेक्टरवर आहे. याचा हेक्टरी ६८ टन उतारा मिळतो. उसाचे उत्पादन इतर तालुक्यांपेक्षा खूपच कमी आहे. ते वाढीसाठी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी उसाचे पाचट न जाळता पाचट कुट्टी करून शेतात गाडले तर जमिनीचा पोत सुधारण्यास व सेंद्रिय कार्बन वाढण्यास मदत होईल. या साठी लागणारे पाचट कुट्टी मशिन सुद्धा ५० टक्के अनुदानावर उपलब्ध आहे.
आधुनिक शेती करण्याकडे तरुणाईचा कल
मुळशी तालुक्यात आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे तरुणाईचा कल आहे. यामध्ये पॉलिहाऊसमध्ये विविध प्रकारची फुले यांचे उत्पादन घेतले जाते. त्यात विविध रंगी गुलाब, जरबेरा, आधुनिक
सूर्यफूल, कार्नेशियन, ऑर्चिड फूल उत्पादन कोळवण भागात सुरू आहे. परदेशी भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात ब्रोकोली शिमला मिरची व इतर प्रकार समाविष्ट आहेत. यासोबतच पोल्ट्री व्यवसाय सुद्धा सुरू आहेत तर
काही ठिकाणी संपूर्णपणे वातानुकूलित शेड उभारून त्यात पोल्ट्री फार्म उत्पादन घेतले जाते.
पूर्णपणे नैसर्गिक शेती करण्यावर भर
कृषी विभाग महाडीबीटी पोर्टलवरील ‘अर्ज एक, योजना अनेक’ डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना समाविष्ट करून घेणार आहे. यामध्ये ५० हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेतीसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. त्या मार्फत गटाला आवश्यक निविष्ठा पुरवून, रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन व प्रबोधन करीत आहे. सध्या सुरुवातीची दोन वर्षे निविष्ठा देणार आहे व तिसऱ्या वर्षात शेती पूर्णपणे नैसर्गिक शेती केली जाणार आहे.
मुळशीतील विविध क्षेत्रे (हेक्टरमध्ये)
भौगोलिक.............९३, ८५१
विविध पिके.............८,५००
सिंचन.............१७४२
वहितीखालील पडीक ............. ३४,०७७
वनविभाग.............१६,०९९
पडीक क्षेत्र.............३७,४२३
पोट खराबा.............६२५१
मुळशीतील दृष्टिक्षेपात योजना
- आत्मा अंतर्गत ७८ शेतकरी गट कार्यरत
- पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ तसेच राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेचा लाभ.
- MREGS अंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू
- बांबू लागवड योजना सुरू असून या योजनेस ७.५० लाखापर्यंत अनुदान उपलब्ध
- तालुक्यातील ३७९ शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी पीक विमा घेतला आहे.
02840, 02842