शिक्रापूर, ता. १५ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील भीमाशेत परिसरात शेतातील गवत (घास) कापल्याचा जाब विचारल्याने अमोल कापरे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रेय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे व ओम दत्तात्रय कापरे (तिघेही रा.भीमाशेत, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अमोल प्रभाकर कापरे (वय ३१, रा.भीमाशेत, तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल कापरे यांनी शेतात जनावरांसाठी चारा लावलेला आहे. ते शेतात काम करत असताना शेतात दत्तात्रेय कापरे हे तिथे आले व त्यांनी शेतातील गवत कापायला सुरुवात केली. याबाबत अमोल यांनी दत्तात्रेय यांना विचारले असता, दत्तात्रेय यांनी हातात असलेला कोयत्याने जीवे मारण्यासाठी धमकी दिली. त्यामुळे अमोल हे जीव वाचवण्याच्या आकांताने दुचाकीवर बसून घरी निघाले. यावेळी त्यांच्या पुढे दत्तात्रेय यांची पत्नी सारिका कापरे व मुलगा ओम कापरे हे आले. यावेळी ओमने अमोल कापरे यांची दुचाकी अडवून दमदाटी केली. दरम्यान, दत्तात्रेय कापरे यांनी अमोल यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले व तिघेही तिथून पळून गेले. यावेळी गंभीर जखमी अमोल कापरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.
पहिला तपास लागेना तोच शेतातील हा दुसरा हल्ला
दोनच दिवसांपूर्वी तळेगावातच पौर्णिमा अनिल भुजबळ यांच्यावर त्यांच्याच शेतात वरील प्रकारे हल्ला करून दोघे जण फरार झाले होते. त्या गुन्ह्याचाही तपास अद्याप लागलेला नसताना तळेगावातील शेतात पुन्हा तसाच जीवघेणा हल्ला झाल्याने तळेगावात चिंतेचे वातावरण आहे.