शिक्रापूर, ता. १८ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे प्रापंचिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १८) पहाटे घडली. मनोहर नागोराव कांबळे (वय ५३) असे आरोपीचे नाव असून, त्याने स्वतःहून शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर कांबळे हा बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आला आणि त्याने पत्नी सविता मनोहर कांबळे (वय ३८, सध्या रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. शिरसो, श्रीरामनगर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) हिचा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने तळेगाव ढमढेरे येथील ''आरंभ सोसायटी''तील त्याच्या घरी धाव घेतली. तिथे सविता कांबळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांच्या शेजारीच रक्ताने माखलेली लोखंडी हातोडी मिळून आली. पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. दरम्यान, राजेश मनोहर कांबळे (वय १९, सध्या रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा.शिरसो श्रीरामनगर ता. मूर्तिजापूर, जि.अकोला) यांच्या फिर्यादीवरून मनोहर कांबळेला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.