काटेवाडी, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सभा, प्रचार फेऱ्या आदींसाठी गर्दी जमवण्यासाठी स्त्री-पुरुषांची मोठी मागणी वाढली आहे. दिवसाला सहाशे ते आठशे रुपये, सकाळचा नाष्टा व दोन वेळेचे जेवण मिळत असल्याने बेरोजगार तरुण, शेतमजूर सध्या उमेदवारा इतकेच प्रचारात व्यस्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
समाधानकारक पावसानंतर पाण्याची उपलब्धता जिरायती भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे साहजिकच रब्बी हंगामामध्ये शेतातली कामे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच इंदापूर बारामतीच्या काही भागांमध्ये द्राक्ष बागांचा हंगाम देखील सुरू झाला आहे. अशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे इंदापूर, बारामती तसेच इतर तालुक्यांत गावोगावी होणाऱ्या प्रचार फेऱ्या, सभा, बैठका यासाठी उमेदवार गर्दी असावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात. त्यासाठी ठेकेदारी पद्धतीने माणसे पुरवणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला जातो.
* दिवसभर प्रचार असेल तर प्रतिमाणसी सहाशे ते आठशे रुपये हजेरी
* सकाळचा नाष्टा व दोन वेळचे जेवण देण्यात येते.
* फक्त सभेला गर्दी करायची असेल तर तीनशे ते पाचशे रुपये व एक वेळचा नाष्टा
* शेतात काम करण्यासाठी मिळतात केवळ महिलांना ४०० तर पुरुषांना ७५० रुपये
बेरोजगार तरुण उमेदवाराइतकेच व्यस्त
शेतमजूर विरंगुळ्यासाठी तसेच पैसे कमवण्यासाठी सभा व प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत. अनेक जण एका उमेदवाराची सभा करून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारफेरीत लगेच सहभागी होतात. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून दुप्पट दिवसाचा रोज मिळतो. दररोजचे हॉटेलचे पोटभर जेवण आणि प्रचार फेऱ्या सभा पार पडल्यानंतर लगेच मिळणारे पैसे यामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर, बेरोजगार तरुण निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराइतकेच व्यस्त झाले आहेत.
''लाडकी बहीण''मुळे महिलांना मागणी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली होती. या योजनेमुळे महिलावर्गाची मते आपल्याकडे वळतील असा सत्ताधाऱ्यांना अंदाज होता. विरोधकांनी देखील महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये घोषणा केल्या. त्यामुळे अनेक उमेदवार प्रचार निमित्त महिला मेळावे घेत आहेत. मेळाव्याला हजेरी लावणाऱ्या महिलांना तीनशे ते पाचशे रुपये रोज दिला जातो.
तुल्यबळ लढतींमुळे वाढवून मिळतोय रोज
इंदापूर तालुक्यामध्ये यंदा तुल्यबळ तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवार आपल्या प्रचार सभा व प्रचार फेऱ्यांसाठी गर्दी जमवण्यास आटापिटा करत आहेत. त्यामुळे सहाजिकच या भागात प्रचार सभा व प्रचार फेऱ्यांना शेतमजूर व बेरोजगारांची अधिक मागणी आहे. याचा फायदा घेत तरुण व शेतमजूर दिवसाचा रोज वाढवून घेत आहेत. स्पर्धेमुळे उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी येणाऱ्या शेतमजुरांची व बेरोजगार तरुणांची अधिक काळजी घ्यावी लागत आहे.
शेतमजुरी आमचा कायमस्वरूपी व्यवसाय आहे. वीस तारखेनंतर तो सुरूच राहणार आहे. मोठमोठे नेते अशा निवडणुकांमध्ये खर्चाचा विचार करत नाहीत. आम्ही आमचा घर प्रपंच भागवण्यासाठीच या प्रचार फेऱ्यांमधून फिरतो. मिळणारे पैसे उडवत नाही तर पुढील कामासाठी जपून ठेवतो. निवडणुकांचा हंगाम आमच्यासाठी सुद्धा एक प्रकारचा व्यवसाय आहे.
- एक शेतमजूर, लासुर्णे, ता. इंदापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.