काटेवाडी, ता. १७ : पुणे जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ५० हजार हेक्टरच्या आसपास पोहोचले आहे. सोयाबीनला मोझॅक रोगापासून धोका असतो. त्यामुळे वेळीच शेतकऱ्यांनी पिवळा आणि हिरवा मोझॅक (केवडा) रोगाचा धोका टाळण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, भोर, बारामती, पुरंदर आदी तालुक्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा पिवळा मोझॅक (मुंगबीन यलो मोझॅक व्हायरस) आणि हिरवा मोझॅक (सोयाबीन मोझॅक व्हायरस) या विषाणूजन्य रोगांचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहावे. हे रोग पांढरी माशी आणि मावा किडींमार्फत पसरतात, ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात.
रोगाची लक्षणे
पिवळा मोझॅक : पानांवर पिवळे चट्टे किंवा अनियमित पट्टे दिसतात. पाने मुरगळतात, अरुंद होतात आणि झाडाची वाढ खुंटते. हा रोग पांढऱ्या माशीमार्फत पसरतो.
हिरवा मोझॅक : पाने जाड, कडक, गर्द हिरवी आणि सुरकुतलेली दिसतात. झाडाची वाढ थांबते. हा रोग मावा किडीमार्फत पसरतो. या रोगांमुळे फुले आणि शेंगा कमी लागतात, दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा शेंगा पोचट होतात, ज्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो.
कृषी विभागाच्या सूचना
सुधारित वाण आणि निरोगी बियाणे : विद्यापीठाने शिफारस केलेल्या सोयाबीनच्या सुधारित वाणांची आणि निरोगी बियाण्याची निवड करावी.
पिकांचे निरीक्षण : लागवडीनंतर नियमितपणे पिकांचे कीड आणि रोगांसाठी निरीक्षण करावे.
प्रादुर्भावग्रस्त झाडांचे व्यवस्थापन : रोगाची लक्षणे दिसणारी झाडे समूळ उपटून जाळावीत किंवा जमिनीत पुरावीत.
कीटकनाशकांचा वापर : मावा आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी असिटामीप्रिड २५ टक्के + बायफेफेंथ्रिन २५ टक्के डब्ल्युजी (२५० ग्रॅम प्रति हेक्टर), डायफेनथ्यूरॉन ४७.८ टक्के एससी (५०० मिली प्रति हेक्टर) किंवा फ्लोनीकामिड ५० टक्के डब्ल्युजी (२०० ग्रॅम प्रति हेक्टर) यापैकी एक कीटकनाशक ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
चिकट सापळे : पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी १० पिवळे चिकट सापळे लावावेत.
तण आणि पाणी व्यवस्थापन : पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पावसाचा ताण पडल्यास संरक्षित पाणी द्यावे.
खतांचा वापर : नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा आणि शिफारशीनुसार खतांचा वापर करावा.
ही खबरदारी घ्यावी
बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी, जेणेकरून किडींचा जीवनक्रम खंडित होईल.
कीटकनाशक फवारणी स्वच्छ पाण्याने आणि शिफारस केलेल्या प्रमाणात करावी. एकच कीटकनाशक वारंवार वापरू नये.
कीटकनाशकांसोबत इतर रसायने मिसळू नयेत, अन्यथा पिकाचे नुकसान होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.