काटेवाडी, ता. १९ : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन मिशन (एनएलएम) योजनेअंतर्गत शेळी-मेंढीपालन, कुक्कटपालन आणि वराहपालनाला चालना देण्यासाठी सुरू केली होती. शेतकऱ्यांनी अनुदान मिळेल या भरवशावर स्वतःच्या खिशातून गुंतवणूक केली. काम पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. वर्ष उलटले तरी ५० टक्के अनुदान न मिळाल्याने कर्जाचे व्याज भरण्याचा ताण सध्या शेतकऱ्यांना भरावा लागत आहेत. परिणामी बारामती तालुक्यातील १५६ जणांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
‘एनएलएम’ योजनेच्या ५० टक्के अनुदानाच्या आश्वासनाने २०२४-२५ मध्ये बारामतीतील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला. स्वतःच्या खिशातून २० टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक आणि बँकांकडून ४०-४५ टक्के कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी गोठ्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. परंतु, सबसिडीअभावी पशुधन खरेदी थांबल्याने शेतकरी बँकेच्या व्याजाच्या ओझ्याखाली दबले आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ‘एनएलएम’ योजना आहे. योजनेअंतर्गत १० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ५० टक्के सबसिडी, ४० टक्के बँक कर्ज आणि १० टक्के स्वतःची गुंतवणूक याप्रमाणे आर्थिक सहाय्य दिले जाते. सबसिडी दोन टप्प्यांत दिली जाते. पहिला टप्पा २५ टक्के प्रकल्प सुरू झाल्यावर आणि उर्वरित २५ टक्के प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळते.
प्रकल्प अर्धवट अवस्थेत अडकले
बारामतीतील १५६ शेतकऱ्यांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून गोठ्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून २० टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक आणि बँकांकडून ४०-४५ टक्के कर्ज घेतले. परंतु, शासनाकडून सबसिडीचा एकही पैसा जमा झाला नसल्याने बँका उर्वरित ५५ टक्के रक्कम पशुधन खरेदीसाठी देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रकल्प अर्धवट अवस्थेत अडकले आहेत.
अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा
शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय आणि आयुक्त कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. अधिकाऱ्यांकडून “सर्व कागदपत्रे केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे पाठवली आहेत,” असे सांगितले जाते. सबसिडी कधी मिळेल याबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. “आम्ही शेतकऱ्यांचे सर्व प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत. सबसिडी मंजुरीचा निर्णय केंद्र सरकार घेते,” असे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा आणि अस्वस्थता वाढत आहे.
प्रशासकीय त्रुटी आणि निधी वितरणातील विलंबामुळे प्रकल्प रखडले आहेत. ‘एनएलएम’ योजना आर्थिक प्रगतीसाठी आशादायी वाटली. पण सबसिडीच्या अभावाने आम्ही आर्थिक विवंचनेत अडकलो आहोत. शासनाने वेळेत सबसिडी दिली तरच आम्हाला फायदा होईल.
- शिवराज गावडे, एनएलएम योजनेचा लाभार्थी
शेतकऱ्यांसमोरील समस्या
वर्षांनंतरही सबसिडीचा पहिला टप्पा (२५ टक्के) मिळाला नाही.
बँका सबसिडी जमा होईपर्यंत पशुधन खरेदीसाठी कर्ज देत नाहीत
शेतकऱ्यांना स्वतःच्या गुंतवणुकीवर आणि बँकेच्या व्याजामुळे आर्थिक ताण
प्रशासनाकडून सबसिडीच्या वितरणाबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
योजनेमधील लाभार्थ्यांनी उभा केलेल्या प्रकल्पांमध्ये अनेक त्रुटी असतात. त्या त्रुटी वेळच्यावेळी दूर करणे गरजेचे असते. संबंधित शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून आपल्या प्रकल्पातील त्रुटी काय आहेत ते समजून घ्यावे. दौंड मध्ये आम्ही या योजनेअंतर्गत अनुदान वितरण केले आहे.
- डॉ. अंकुश परिहार, पशुसंवर्धन उपायुक्त, पुणे
01261
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.