काटेवाडी, ता. २७ : ‘‘कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी (ता. २७) बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडीतील वृद्धाश्रम, तसेच तिरंगा चौकाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. पवार यांनी शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क परिसरातील कालव्याशेजारील रस्त्याची पाहणी केली व सुधारित कामासाठी सूचना दिल्या. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या अनेक भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शिवकाळातील सदरा व आग्रा दरबार, शिवकालीन बाजारपेठा व राजसभा, राजगड प्रवेशद्वाराची प्रतिकृती, शिवकालीन आरमार आणि माहितीपट व थ्रीडी ॲनिमेशनद्वारे शिवकालीन युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीच्या वनपरिक्षेत्र अंतर्गत उभारण्यात आलेल्या कन्हेरी वन उद्यान परिसरातील विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी ‘ॲडव्हेंचर अँड नेचर क्लब’ मार्फत साहसी खेळांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. याप्रसंगी १४ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि बारामतीच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.