काटेवाडी, ता. ३० : स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लवकर मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या विण्ड्स (WINDS) वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड डाटा सिस्टीम योजनेअंतर्गत प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत.
तत्पूर्वी राज्य शासनाने २७ जून २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयात निधी वाटपाच्या वर्षांबाबत काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी गुरुवारी (ता. २८) काढलेल्या शुद्धिपत्रकाद्वारे दुरुस्त केल्या आहेत. ही केंद्रे शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर हवामानाची अचूक माहिती देतील, ज्यामुळे पेरणी, सिंचन, कापणीचे नियोजन सोपे होईल आणि पूर, दुष्काळासारख्या आपत्तींची वेळेवर सूचना मिळेल.
केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत देशभरात ३०८ हवामान केंद्रे आणि ५५,५७० पर्जन्यमापक यंत्र बसवली जाणार आहेत. ही यंत्रे तापमान, पाऊस, वारा आणि हवेची स्थिती व अंदाज मोजतील. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजनेसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रात यापूर्वी महावेध योजनेतून महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्रे उभारली गेली. आता प्रत्येक गावात ही सुविधा पोहोचवण्यासाठी महावेधला पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी स्थानिक पातळीवर थेट हवामान अंदाज घेऊ शकतील.
केंद्र-राज्याचा खर्चाचा वाटा:
२०२५-२६: केंद्र ८० टक्के, राज्य २० टक्के
२०२६-२७: केंद्र ६० टक्के, राज्य ४० टक्के
२०२७-२८ पासून: केंद्र-राज्य समान (५०:५०)
यासाठी २०२५-२६ मध्ये ९.७७ कोटी रुपये खर्च होणार असून, निधी पीक विमा योजनेतून येईल.
काम कोण करणार?
स्कायमेट वेदर सर्व्हिसेससह पाच कंपन्या ही योजना राबवतील. प्रत्येक गावात एक व्यक्ती यंत्रांची देखभाल करेल. माहिती WINDS पोर्टलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोचेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.