काटेवाडी, ता. १० : बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला हवालदार अंजना बिभीषण नागरगोजे (वय ३८, रा. निर्मिती विहार सोसायटी, रुई, बारामती) यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (ता. १०) दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे बारामतीत एकच खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने मंगळवारी (ता. ९) पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदार, त्यांची पत्नी, सासू-सासरे यांच्याविरोधात २ सप्टेंबर २०२५ रोजी मेहुण्याच्या पत्नीने बारामती तालुका पोलिस ठाण्यात शारीरिक आणि मानसिक छळाची फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या हवालदार नागरगोजे यांनी तक्रारदार आणि त्यांच्या तीन नातेवाइकांना गेट जामीन देऊन अटक टाळण्यासाठी सुरवातीला एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे २० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने यास नकार देत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून बुधवारी बारामती तालुका पोलिस ठाण्यात सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना नागरगोजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सविता सावळे आणि सहायक पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने केली.