काटेवाडी, ता. ३० : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ‘महाविस्तार’ ॲपला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) २१ हजार २५२ हे ॲप डाऊनलोड केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा, यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत ॲपबद्दल माहिती देऊन नोंदणी वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण १४ तालुक्यांत १,८९२ गावे आहेत. २६ डिसेंबरपर्यंत या ॲपवर १ लाख ५६ हजार १६२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आंबेगाव, बारामती, जुन्नर आणि इंदापूर या तालुक्यांत सर्वाधिक नोंदण्या झाल्या आहेत.
महाविस्तार ॲपची वैशिष्ट्ये
* शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि खतांचा वापर याबाबत तज्ज्ञ सल्ला मिळतो.
* हवामान अंदाज आणि स्थानिक बाजारभावाची माहिती रिअल टाइममध्ये उपलब्ध.
* सरकारी अनुदान, कर्ज आणि योजनांची माहिती एका क्लिकवर.
* ॲपमध्ये व्हिडिओ आणि लेखांच्या माध्यमातून शेतीचे प्रशिक्षण.
* मराठीसह इतर भाषांमध्ये उपलब्ध, वापरण्यास सोपे आणि मोफत.
कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाविस्तार ॲप हे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी साधन आहे. या ॲपमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जातील. आमची मोहीम यशस्वी होत असून, एका दिवसात २१ हजारांहून अधिक डाऊनलोड हे त्याचे यश आहे. पुढील काळात आणखी शेतकऱ्यांना जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा लाभ घ्यावा.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी
नोंदणीची आकडेवारी (२६ डिसेंबरपर्यंत)
तालुका........ गावे..... नोंदणी
आंबेगाव........ १४२........ १८,१०३
बारामती........ ११७........ १७,३९७
जुन्नर........ १८४........ १६,६९४
इंदापूर........ १४५........ १३,९५५
शिरूर........ १०४........ १२,०८८
हवेली........ १३०........ ११,९२२
दौंड........ ९८........ ११,७४५
भोर........ २००........ १०,९२०
खेड........ १८९........ १०,८८१
मुळशी........ १४८........ १०,००६
पुरंदर........ १०१........ ९,८३३
मावळ........ १९४........ ७,०८८
वेल्हे........ १३०........ ५,१६९
पुणे सिटी........ १०........ ३६१